परदेशातून मागणी वाढल्याने दरवाढ

राहुल खळदकर, लोकसत्ता 

पुणे : घरोघरी वर्षभरासाठी मसाले बनविण्याचा हंगाम पुढील महिन्यापासून सुरू होणार असला तरी त्याआधीच लाल मिरच्यांच्या दरांमध्ये वाढ व्हायला लागली आहे. बांगलादेश, फिलिपाईन्स, थायलंड या देशातून अचानक मिरचीला मागणी वाढल्याने प्रतिकिलोचे दर मंगळवारी १४० ते १६० रुपयांवर जाऊन पोहोचले. परिणामी, मिरचीच्या देशांतर्गत दरात वाढ झाली आहे.  आंध्र प्रदेशातील गुंटूर मिरचीच्या बाजारात नवीन लाल मिरचीचे दर कमी झाले होते. करोनामुळे चीनमधून गुंटूर मिरचीला मागणी कमी झाली. मात्र, अन्य देशांतील वाढत्या मागणीमुळे लाल मिरचीचे दर वाढले आहेत. तेजा मिरचीचे दरही कमी झाले होते. मात्र परदेशातील मागणीमुळे तेजा मिरचीच्या दरात टप्याटप्याने वाढ झाल्याची माहिती दी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे (फॅम) पदाधिकारी आणि मिरचीचे मार्केट यार्डातील व्यापारी वालचंद संचेती यांनी सांगितले.

आंध्र प्रदेशातील गुंटूर मिरचीच्या बाजारात नवीन लाल मिरचीचे दर कमी झाले होते. करोनामुळे चीनमधून गुंटूर मिरचीला मागणी कमी झाली. मात्र, अन्य देशांतील वाढत्या मागणीमुळे लाल मिरचीचे दर वाढले आहेत. तेजा मिरचीचे दरही कमी झाले होते. मात्र परदेशातील मागणीमुळे तेजा मिरचीच्या दरात टप्याटप्याने वाढ झाल्याची माहिती दी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे (फॅम) पदाधिकारी आणि मिरचीचे मार्केट यार्डातील व्यापारी वालचंद संचेती यांनी सांगितले. गेल्या हंगामात फेब्रुवारी महिन्यात तेजा मिरचीची विक्री घाऊक बाजारात प्रतिकिलो ८५ ते ८८ रुपये या दराने केली जात होती. यंदा या मिरचीचे दर १२० ते १३० रुपयांपर्यंत आहेत. सीड व्हरायटी लाल मिरचीची खरेदी मसाला उत्पादक करतात. पूर्वी लाल मिरचीचे दर वाढण्यास दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागायचा. यंदा मात्र मिरची बाजारात मोठी उलाढाल होत असल्याचे निरीक्षण संचेती यांनी नोंदविले.

चीनच्या मागणीवर दर अवलंबून..

साधारण जानेवारीच्या सुरुवातीला लाल मिरचीचे दर कमी होत असत. जानेवारी महिन्यात नवीन मिरचीची आवक होते. या वर्षी आवक चांगली होऊनसुद्धा दर कायम आहेत. यापुढील काळात चीनकडून मिरचीला कशी मागणी राहील, यावर दरातील चढ उतार अवलंबून राहतील.

उत्पादन किती?

यंदाच्या हंगामात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात लाल मिरचीचे उत्पादन दोन ते अडीच कोटी पोती (एक पोते ४० किलोचे) होण्याची शक्यता आहे. कर्नाटकामध्ये ६० ते ६५ लाख पोती उत्पादन होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात देखील ८ ते १० लाख पोती उत्पादन होईल. अशा पद्धतीने संपूर्ण देशात सव्वातीन ते साडेतीन कोटी पोती मिरची उपलब्ध होऊ शकेल. गेल्या हंगामाएवढे यंदा उत्पादन होणार असले, तरी गेल्या वर्षीचा मिरचीचा साठा संपत चालला आहे, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. यंदाच्या हंगामात लाल मिरचीचे उत्पादन १५ टक्के वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

झाले काय? :  गेल्या हंगामात फेब्रुवारी महिन्यात तेजा मिरचीची विक्री घाऊक बाजारात प्रतिकिलो ८५ ते ८८ रुपये या दराने केली जात होती. यंदा या मिरचीचे दर १२० ते १३० रुपयांपर्यंत आहेत. सीड व्हरायटी लाल मिरचीची खरेदी मसाला उत्पादक करतात. पूर्वी लाल मिरचीचे दर वाढण्यास दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागायचा. यंदा मात्र मिरची बाजारात मोठी उलाढाल होत आहे.

पुढे काय? गेल्या हंगामात लाल मिरचीची ४० ते ४५ लाख पोती (एक पोते ४० किलोचे) शीतगृहात पडून होती. यंदा शीतगृहातील मिरचीचा साठा संपत आला असून त्यामुळे लाल मिरचीचे दर चढे राहण्याची शक्यता आहे.