करोनाकाळातील आचारसंहिता
पुणे : राज्य शासनाचे उपस्थितीबाबतच्या नियमांचे पालन करून शिक्षण-संशोधन संस्थांतील संशोधन कार्य सुरू ठेवण्यात आले आहे. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे लहान गट करून, प्रात्यक्षिकांचे वेळापत्रक करून संस्थांमध्ये संशोधन करण्यात येत आहे.
गेल्यावर्षी मार्चमध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर संशोधन संस्थांतील विद्यार्थी आपापल्या गावी गेले होते. त्यानंतर सप्टेंबरनंतर काही विद्यार्थ्यांनी संस्थेत परत येऊन आपले संशोधनाचे काम सुरू के ले होते. काही अभ्यासक्रमांमध्ये प्रयोगशाळातील प्रात्यक्षिके हा महत्त्वाचा घटक असल्याने मार्चमध्ये पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यावर विद्यार्थ्यांनी पुन्हा गावी जाण्यापेक्षा वसतिगृहातच राहून अभ्यास आणि संशोधन सुरू ठेवणे पसंत के ले. मात्र संस्थांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन, शासनाच्या नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांनी वसतिगृहात सोय के ली आहे. तसेच उपस्थितीच्या नियमांचे पालन करून संशोधन कामकाज करण्यात येत आहे.
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर पुणे) संशोधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. संजीव गलांडे म्हणाले, की चौथ्या, पाचव्या वर्षांचे आणि पीएच.डी.चे मिळून जवळपास एक हजार विद्यार्थी संस्थेतील वसतिगृहात राहात आहेत. या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिके समाविष्ट आहेत. राज्य सरकारच्या नियमानुसार उपस्थिती मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे गट करून प्रात्यक्षिकांसाठीचे वेळापत्रक ठरवून देण्यात आल्याने प्रयोगशाळेत जास्त संख्येने विद्यार्थी जमत नाहीत. नियमांचे पालन करून आवश्यक संशोधनाचेच कामकाज सुरू आहे.
‘सध्या शिक्षण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहे. संस्थेच्या वसतिगृहात दोन-तीनच विद्यार्थी राहात आहेत. मात्र तेही त्यांच्या खोलीत राहूनच ऑनलाइन पद्धतीने त्यांचे शिक्षण, संशोधन करत आहेत,’ असे गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. राजस परचुरे यांनी सांगितले.
सध्या संस्थेच्या वसतिगृहात विद्यार्थी नाहीत. संशोधनाच्या कामासाठी संशोधक संस्थेत येतात. मात्र राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे उपस्थितीचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.
– डॉ. प्रशांत ढाके फालकर, संचालक, आघारकर संशोधन संस्था