नगर रस्ता भागातील डोंगरगावात असलेल्या एका वस्तीत मध्यरात्री दरोडेखोरांनी हल्ला केला. सशस्त्र दरोडेखोरांनी केलेल्या दाम्पत्यावर कुऱ्हाडीने वार केले. मारहाणीत ज्येष्ठ नागरिक मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली.

केरबा भिवा गडदे (वय ६५, रा. गडदे वस्ती, डोंगरगाव, ता. हवेली) असे मृत्यूमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात मुक्ताबाई केरबा गडदे (वय ६१) गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. निर्मला अशोक गडदे (वय ३०) यांनी यासंदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तीन दरोडेखोरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरबा गडदे, मुक्ताबाई, सून निर्मला, मुलगा अशोक आणि त्यांची मुले गडदे वस्तीत राहायला आहेत. सोमवारी मध्यरात्री निर्मला यांचे पती अशोक आणि मुलगा शेतीला पाणी देण्यासाठी बाहेर पडले. मध्यरात्री गडदे वस्तीत आलेल्या चोरट्यांनी केरबा आणि मुक्ताबाई यांच्या खोलीचे दार वाजवले. दरोडेखोरांकडे कुऱ्हाड आणि तीक्ष्ण शस्त्रे होती. दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. केरबा आणि मुक्ताबाई यांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

दरोडेखोरांनी मुक्ताबाई यांच्या गळयातील दागिने हिसकावले. मुक्ताबाई आणि केरबा यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीचा घाव घातला. आरडाओरडा ऐकून झोपेत असलेल्या निर्मला जाग्या झाल्या. त्यांनी सासू-सासरे राहत असलेल्या खोलीच्या दिशेने धाव घेतली. अंधारात दरोडेखोर पसार झाल्याचे त्यांनी पाहिले. या घटनेनंतर तातडीने गंभीर जखमी झालेल्या दोघांना रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान, केरबा यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत.