News Flash

वारजे भागात पीएमपीच्या धावत्या गाडीला आग

पीएमपीच्या पुढील बाजूने पेट घेतला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली.

मुंबई-बंगळुरू बाहय़वळण मार्गावर धावत्या पीएमपी गाडीला आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी वारजे भागात घडली.

पुणे : मुंबई-बंगळुरू बाहय़वळण मार्गावर धावत्या पीएमपी गाडीला आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी वारजे भागात घडली. पीएमपी चालकाने प्रसंगावधान राखून प्रवाशांना खाली उतरविल्याने अनर्थ टळला.

बाहय़वळण मार्गावरून निगडी ते कात्रज या मार्गावरील पीएमपीची गाडी सकाळी पावणेअकराच्या सुमारास कात्रजच्या दिशेने जात होती, त्या वेळी आरएमडी महाविद्यालयाजवळ पीएमपीच्या पुढील भागातून धूर येत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. बसचालकाने प्रसंगावधान राखून वाहकाच्या मदतीने प्रवाशांना खाली उतरवले.

दरम्यान, पीएमपीच्या पुढील बाजूने पेट घेतला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. कोथरूड अग्निशमन केंद्राच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात आली. आगीमागचे कारण समजू शकले नाही.

वर्षभरात पीएमपीच्या गाडय़ांना आग लागण्याचे १३ प्रकार

देखभाल दुरुस्ती अभावी वर्षभरात पीएमपीच्या १३ गाडय़ांनी पेट घेतला असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे प्रवाशांसंबंधीची पीएमपी प्रशासनाची अनास्थाही स्पष्ट झाली आहे. गाडय़ांनी पेट घेण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे आता पीएमपी प्रशासनाने गाडय़ांचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण (फायर ऑडीट) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तेरा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही अशा घटना रोखण्यात यश मिळणार की ही समिती केवळ फार्स ठरणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील जवळपास दहा लाख प्रवासी पीएमपीमधून प्रवास करतात. मोडकळीस आलेल्या, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या गाडय़ा, भर रस्त्यातच नादुरुस्त होऊन बंद पडणाऱ्या गाडय़ा यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. त्यातच अलीकडे गाडय़ांनी पेट घेण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. वारजे येथे पीएमपीच्या गाडीने बुधवारी पेट घेतला. यात जीवितनाही झाली नसली तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला. या घटनेनंतर पीएमपी प्रशासनावर टीका सुरू झाली. त्यामुळे त्याची दखल घेत प्रशासनाने त्यासंदर्भात बुधवारी तातडीची बैठक घेतली.

पीएमपीच्या ताफ्यात ८१९ डिझेलवर चालणाऱ्या आणि ५६३ सीएनजीवर चालणाऱ्या अशा स्वमालकीच्या १ हजार ३८२ गाडय़ा आहेत. भाडेतत्त्वावरील ६५३ सीएनजीवर चालणाऱ्या गाडय़ा पीएमपीने घेतल्या असून एकूण २ हजार ३५ गाडय़ा संचलनासाठी उपलब्ध आहेत. सन २०१७-१८ या वर्षांत १३ गाडय़ांनी पेट घेतला असल्याची माहिती या बैठकीतून पुढे आली. त्यामुळे आगीच्या घटना रोखण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याचेही निश्चित करण्यात आले.

नोटीस नको, कारवाई करा

प्रवाशांना सुविधा देण्यासाठी पीएमपीने काही गाडय़ा खासगी ठेकेदारांकडून भाडेकरारावर घेतल्या आहेत. ठेकेदाराकडील गाडय़ांनी पेट घेण्याच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. त्यामुळे जुन्या गाडय़ांची नियमित देखभाल दुरुस्ती करावी, अशी सूचना ठेकेदारांना देण्यात आल्याचे पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे लाखो प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे दिसून येत आहे. आग लागण्याच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर कंपनीला जाब विचारण्यापेक्षा त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही प्रवासी आणि स्वयंसेवी संस्थांकडून होत आहे.

तांत्रिक समिती स्थापन

गाडय़ांची दैनंदिन देखभाल दुरुस्ती करताना योग्य ती काळजी घेण्यासंदर्भात संबंधित आगारांना सूचना देण्यात आल्या आहेत. गाडय़ांचे तांत्रिक परीक्षण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून अग्निसुरक्षा लेखापरीक्षण या समितीकडून करण्यात येणार आहे. तेरा जणांची ही समिती असून यात एआरएआय, सीआयआरटी, आरटीओ, टाटा मोटर्स, अशोक लेलॅण्ड, अ‍ॅन्थोनी गॅरेज प्रायव्हेट लिमिटेड, महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह या ठेकेदारांच्या प्रतिनिधींसह पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. डिझेल आणि सीएनजी गाडय़ांचे दरमहा परीक्षण करून योग्य त्या उपाययोजना समितीने प्रस्तावित कराव्यात, दर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात बैठक घेऊन त्याचा अहवाल सादर करावा, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 1:09 am

Web Title: running pmt bus caught fire in warje pune
Next Stories
1 सेवाध्यास : अवयवदानजागृती
2 टोळक्याची दहशत; तरुणाचा पाठलाग करुन खुनाचा प्रयत्न
3 आनंद तेलतुंबडे बद्दलचे मेल बनावट, बचाव पक्षाच्या वकिलाचा दावा
Just Now!
X