महाविद्यालयांच्या महिला स्वच्छतागृहांमध्ये ‘सॅनेटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन’ उपलब्ध करून देण्याबाबत उच्च शिक्षण विभागाने सूचना देऊनही अद्याप महाविद्यालये मात्र उदासीनच आहेत. किंबहुना अनेक महाविद्यालयांमधील स्वच्छतागृहे आणि विद्यार्थिनी कक्ष अस्वच्छच असल्याचे दिसत आहे.
महाविद्यालयांमध्ये स्वच्छतागृहांमध्ये ‘सॅनेटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन’ उपलब्ध करून देण्याबाबत उच्च शिक्षण विभागाने १७ ऑक्टोबरला महाविद्यालयांना सूचना केल्या होत्या. मात्र उच्च शिक्षण विभागाच्या सूचना न ऐकण्याचाच ठेका घेतलेल्या अनेक महाविद्यालयांनी त्याकडे दुर्लक्षच केल्याचे दिसत आहे. किंबहुना अनेक महाविद्यालयांमधील महिला स्वच्छतागृहांची परिस्थितीही वाईटच आहे.
सॅनेटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन्स उपलब्ध करून देण्याबाबत पुणे विभागीय सहसंचालक कार्यालयाने विभागातील महाविद्यालयांना पत्र पाठवले आहे. मशिन बसवण्यासंबंधी महाविद्यालयांनी केलेल्या कार्यवाहीचे तपशील सोमवापर्यंत (७ डिसेंबर) पाठवण्याचे आदेश सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांनी दिले आहेत. विद्यापीठाची महिला वसतिगृहे, शासकीय महाविद्यालये या ठिकाणीही मशिन्स नाहीत. मात्र अशासकीय महाविद्यालयांकडेच याबाबतचे तपशील विभागाने मागितले आहेत.