चिन्मय पाटणकर – chinmay.reporter@gmail.com

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांना घेऊन हंगेरीतील नाटय़ दिग्दर्शक पीटर वाल्क्स यांनी ‘द डेव्हिल’ हे नाटक दिग्दर्शित केले आहे. या निमित्ताने प्रथमच हंगेरियन नाटक मराठीत सादर होत आहे.

ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच परदेशी दिग्दर्शकासह काम करण्याचा अनुभव मिळाला आहे. अतिथी दिग्दर्शक या उपक्रमाअंतर्गत हंगेरीतील प्रसिद्ध दिग्दर्शक पीटर वाल्क्स यांनी द डेव्हिल हे नाटक दिग्दर्शित केले आहे.

नाटय़शास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून अतिथी दिग्दर्शक निमंत्रित केले जातात. आतापर्यंत विजय केंकरे, सुनील शानबाग, अतुल पेठे, मोहित टाकळकर, अनंत कान्हो अशा महत्त्वपूर्ण दिग्दर्शकांनी विद्यार्थ्यांना घेऊन नाटक केले. या उपक्रमाअंतर्गत या वर्षी पहिल्यांदाच परदेशी दिग्दर्शकाला निमंत्रित करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना पीटर वाल्क्स यांच्यासारख्या अनुभवी दिग्दर्शकासह नाटक करण्याची संधी मिळाली आहे. वाल्क्स यांनी द डेव्हिल हे खूप गाजलेले नाटक या उपक्रमासाठी निवडले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूळ हंगेरिअन असलेलं हे नाटक मराठीत सादर केले जाणार आहे. या नाटकाची मराठी रंगावृत्ती प्रदीप वैद्य यांनी लिहिली आहे.

‘जागतिक रंगभूमीविषयी मार्गदर्शन केलं जातं. मात्र, पाश्चिमात्य नाटकांचा अभ्यास अनुवाद करून केला जातो. मात्र, मूळ भाषा किंवा लेखकाची संवेदनशीलता कळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या नाटकाकडे भारतीय चष्म्यातून पाहावं लागतं. विद्यार्थ्यांना ती संवेदनशीलता कळावी, अनुभवायला मिळणंही महत्त्वाचं आहे. पश्चिमेकडे कलाभिव्यक्ती जगण्याचा भाग झाली आहे. ही कलाभिव्यक्ती समजून घेण्यासाठी, युरोपियन रंगभूमीवरची व्यावसायिकता, शिस्त अनुभवण्यासाठी युरोपियन दिग्दर्शकाला निमंत्रित करण्याचा विचार होता. त्यासाठी पीटर वाल्क्स यांनी तयारी दर्शवली.

हे नाटक उभं राहण्याची प्रक्रिया विलक्षण होती. वाल्क्स यांनी मूळ हंगेरियन संहिता, इंग्रजी अनुवाद आणि मराठी रूपांतराची संहिता घेऊन इंग्रजी येणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर बसून तिन्ही भाषांतील प्रत्येक शब्द, वाक्य समजून घेतले. जवळपास दहा दिवस या पद्धतीनं केवळ संहितेवर काम झालं. त्यानंतर त्यांनी नाटकातील प्रसंगांचा दृश्य रूपाने विचार करून संहितेची मांडणी केली. हा अनुभव नक्कीच वेगळा आहे,’ असं विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांनी सांगितलं.

या नाटकाचे प्रयोग २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान विद्यापीठातील संत नामदेव सभागृहात सायंकाळी सहा वाजता होणार आहेत. नाटकासाठी कोणतेही प्रवेशमूल्य नाही.

रंगभूमीवरील कथनांविषयी २७ ऑक्टोबरला चर्चासत्र

रंगभूमी हे महत्त्वाचं माध्यम आहे. कारण रंगभूमीला कथनाची एक परंपरा आहे. लोककलांपासून ते आधुनिक नाटकांपर्यंतचा प्रवास या कथन पद्धतीनं केला आहे. या कथनाच्या वाटचालीचा आढावा घेण्यासाठी डॉ. अशोकदा रानडे स्मृती प्रतिष्ठानतर्फे ‘रंगभूमीवरील कथन’ हे चर्चासत्र २७ ऑक्टोबरला आयोजित करण्यात आलं आहे. ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे होणाऱ्या या चर्चासत्रात झुलैखा चौधरी, अतुल पेठे, डॉ. विश्वनाथ शिंदे, रामू रामनाथन, अनुभा फतेहपुरीया, विनय शर्मा, शैली सथ्यू, डॉ. माधुरी दीक्षित, डॉ. शर्मिष्ठा सहा आणि डॉ. प्रवीण भोळे या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. बालनाटय़ातील कथन, लेखकांचे कथन, दिग्दर्शकीय भान, नाटय़पूरक तंत्रातील कथन या अनुषंगाने आपापले अनुभव, विचार मांडणार आहेत. आपल्याकडे कथनांच्या वैविध्यपूर्ण परंपरा आहेत. आख्यानांपासून तमाशांपर्यंत गोष्ट सांगण्याच्या निरनिराळ्या तऱ्हा आहेत. नाटकात लेखकीय कथन पद्धतीसह दिग्दर्शकही स्वतंत्रपणे कथन करतो. १८व्या शतकात बंदिस्त नाटय़गृह आपल्याकडे सुरू झाली. त्यानंतर कथनांची परंपरा कशा पद्धतीनं बदलली, आताच्या नाटकातील कथने, कथनातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक भान असे वेगवेगळे पैलू चर्चासत्रात मांडले जाणार आहे, असं नाटककार आणि चर्चासत्राचे समन्वयक आशुतोष पोतदार यांनी सांगितलं.