नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात आजपासून

पुणे : करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही शाळा प्रत्यक्ष सुरू होणार नसल्याने विद्यार्थ्यांचा ऑनलाइनच किलबिलाट होणार आहे. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात आजपासून (१५ जून) होणार असून, ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू होणार आहेत.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या आटोक्यात आलेला असला, तरी शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांची सुरुवात शाळांना ऑनलाइन पद्धतीनेच करावी लागणार आहे. ऑनलाइन शाळांसाठी शाळा व्यवस्थापनांकडून तयारी करण्याच्या दृष्टीने शिक्षक पालक संघाच्या बैठका ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या आहेत, ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थी-पालकांनी काय काळजी घ्यायची याबाबतच्या सूचनाही बहुतेक शाळांनी दिल्या आहेत.

गेल्या वर्षी शाळा सुरू होताना करोनाचा संसर्ग प्रामुख्याने शहरी भागात होता. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने अध्ययन अध्यापनाला प्राधान्य देतानाच करोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागात शिक्षक गावात जाऊन विद्यार्थ्यांच्या गटांना प्रत्यक्ष शिकवण्यास शासनाने मुभा दिली होती.

यंदा तशी परिस्थिती नाही. गेल्या वर्षांतील दोन-तीन महिन्यांचा कालावधी वगळता शैक्षणिक प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच पार पाडावी लागली. तसेच शैक्षणिक वर्षही काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. या पाश्र्वभूमीवर गेल्या वर्षभरातील ऑनलाइन शिक्षणाचा अनुभव गाठीशी आल्यामुळे शाळांकडून अधिक चांगल्या पद्धतीने शैक्षणिक कामकाज करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

सह्य़ाद्री वाहिनीवर शैक्षणिक तासिका

शाळा सुरू नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने गेल्यावर्षी ‘शाळा बंद शिक्षण सुरू’, ‘स्वाध्याय’ असे विविध उपक्रम राबवले होते. तसेच ज्ञानगंगा या उपक्रमाद्वारे दूरचित्रवाणीवरील सह्य़ाद्री वाहिनीवर शैक्षणिक कार्यक्रम २६ ऑक्टोबरपासून सुरू के ले होते. मात्र यंदा नवे शैक्षणिक वर्ष सुरू होतानाच पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सह्य़ाद्री वाहिनीवरील ज्ञानगंगा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन या वेळेत इयत्तानिहाय तासिका होतील. पहिल्या टप्प्यात दहावी मराठी, इंग्रजी माध्यमाचे, बारावीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरू करण्यात येत आहे. कार्यक्रमांचे वेळापत्रक http://www.maa.ac.in या संकेतस्थळावर देण्यात आल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.