वेगाने प्रवास करीत असलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी सध्या नव्वद टक्क्य़ांहून अधिक महाराष्ट्र व्यापला असून, पुढील एक ते दोन दिवसांत मुंबई आणि कोकणच्या उर्वरित भागांतही मोसमी पाऊस कोसळणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवार २५ जूनला मुंबईसह कोकण विभागात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. २६ ते २८ जून या कालावधीत कोकण विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळाने बाष्प खेचून नेल्याने मोसमी वाऱ्यांचे प्रवाह क्षीण होऊन त्यांची प्रगती थांबली होती. त्यामुळे ८ जूनला केरळमध्ये दाखल होऊनही १९ जूनपर्यंत त्यांनी फारशी प्रगती केली नव्हती. मात्र या काळात मोसमी वाऱ्यांचे प्रवाह बळकट होऊन २० जूनपासून त्यांनी वेग घेतला. तळकोकण ते कोल्हापूपर्यंत त्यांनी मजल मारली. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भ व्यापला आहे. मध्य महाराष्ट्रातील नगरनंतर त्यांनी सोमवारी (२४ जून) पुणे, नाशिकपर्यंत धडक दिली. कोकण विभागात अलिबागपर्यंत मोसमी वारे पोहोचले आहेत. जवळपास ९३ ते ९४ टक्के राज्यात मोसमी वारे पोहोचले आहेत. मुंबईसह उर्वरित राज्यात ४८ तासांच्या आत ते पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दुष्काळी भागांत पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. सोलापूर जिल्ह्यतील मंगळवेढा, सांगोला, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर आदी दुष्काळी पट्टय़ात पाऊस झाला. या भागात पूर्वमोसमी पावसाने दडी मारली होती.