फलाटांवर लिफ्ट आणि बॅटरीवरील वाहन सुरू करण्याची मागणी

पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या वाढत असताना या गर्दीमध्ये स्थानकात येणारा ज्येष्ठ नागरिक मात्र आवश्यक सुविधांपासून दुर्लक्षित राहतो आहे. फलाटावरून पादचारी पुलावर चढून जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसह अपंग आणि रुग्णांचीही हेळसांड होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे देशातील इतर महत्त्वाच्या स्थानकांप्रमाणे फलाटावर लिफ्टची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे नेहमीच बंद असणारे बॅटरीवरील वाहन सुरू करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर पुणे- लोणावळा लोकलसह अडीचशेहून अधिक गाडय़ांची रोज ये-जा असते. त्यामुळे प्रवाशांची संख्याही वाढली असल्याने वाढीव पार्किंग, नवा पादचारी पूल, फलाटांची लांबी वाढविण्यासह इतर विविध कामे रेल्वेकडून करण्यात येत असली, तरी प्रवाशांच्या गर्दीमध्ये ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि रुग्णांच्या व्यवस्थेकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसून येते. रस्ते मार्गापेक्षा ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेचा प्रवास सोयीचा ठरतो. त्यामुळे रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य दिले जाते. मात्र, स्थानकात आल्यानंतर त्यांची विविध पद्धतीने हेळसांड होते.

स्थानकात सध्या २४ ते २६ डब्यांच्या मोठय़ा गाडय़ा येतात. सर्व स्थानकांना जोडणारा सध्या एकच पूल कार्यरत आहे. जास्त डब्यांच्या गाडय़ांतून उतरून साहित्यासह मध्यवर्ती पुलापर्यंत येणेच ज्येष्ठ नागरिक किंवा अपंगांसाठी जिकिरीचे ठरते. त्यानंतर पादचारी पुलावर येण्यासाठी पायऱ्या चढण्याचे दिव्य पार पाडावे लागते. देशातील काही महत्त्वाच्या आणि प्रमुख स्थानकांमध्ये पादचारी पुलापर्यंत जाण्यासाठी लिफ्टची व्यवस्था आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि रुग्णांच्या दृष्टीने ही सुविधा अत्यंत उपयुक्त आहे. मात्र, पुणे स्थानकाबाबत अद्याप त्याचा विचारही झालेला नाही.

स्थानकामध्ये ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि रुग्णांसाठी बॅटरीवर चालणारे वाहन आहे. काही दिवस हे वाहन सुरू होते. मात्र, अचानक ते बंद करण्यात आले. वाहन असूनही त्याचा उपयोग संबंधित घटकांना होत नाही. स्थानकात सकाळी आणि संध्याकाळी मोठय़ा प्रमाणावर गर्दी असते. या गर्दीतून वाट काढीत ज्येष्ठ नागरिक चालत असतात. पादचारी पुलावरून चढतानाच नव्हे, तर उतरतानाही त्यांना गर्दीचा सामना करावा लागतो. त्यामुळे स्थानकातून बाहेर पडण्यासाठीही सरकता जिना असावा, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षां शहा यांनी केली आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी कोणतीही व्यवस्था नाही. रेल्वेने या प्रवाशांना अक्षरश: वाऱ्यावर सोडले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांच्या दृष्टीने स्थानकात तातडीने लिफ्टची व्यवस्था उभारण्याची गरज आहे. पुणे ‘वर्ल्ड क्लास’ स्थानक म्हणून विकसित करण्यात येत आहे. अशा पद्धतीच्या इतर स्थानकांवर ही व्यवस्था आहे.

– हर्षां शहा, रेल्वे प्रवासी ग्रुप अध्यक्षा