ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर यांची हत्या त्यांच्या नोकरानेच केल्याचे केल्याचे उघड झाले आहे. नोकरानेच तशी कबूली दिल्याची माहिती अलंकार पोलिसांनी दिली असून आरोपीला नोकराला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दीपाली कोल्हटकर यांचा शवविच्छेदन अहवालात त्यांच्या डोक्यात प्रहार करून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली. ज्या दिवशी ही हत्या झाली त्या दिवशी त्यांचा नोकर किसन मुंढे (वय १९) हा कामाच्या वेळेअगोदर एक तास लवकर घरी गेला होता. ही बाब पोलिसांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने आपणच ही हत्या केल्याची कबूली दिली. हा आरोपी असलेला नोकर हा मराठवाड्यातील भूम येथील रहिवासी आहे. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले.
एरंडवणा भागात आपल्या पत्नी आणि आईसोबत राहणारे ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर हे मागील तीन वर्षांपासून आजारी असून अंथरुणाला खिळून आहेत. गुरुवारी रात्री सायंकाळच्या सुमारास त्यांच्या स्वयंपाक घरातून धूर येत असल्याचे त्यांच्या वयोवृद्ध आईने पाहिले. काय जळत आहे हे पाहण्यासाठी त्या गेल्या तर तेथे दीपाली कोल्हटकर यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत त्यांना आढळून आला. या संशयास्पद प्रकारावरून अनेक तर्कविर्तक लावण्यात येत होते. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतरच सर्व माहिती पुढे येईल असे पोलिसांनकडून सांगण्यात येत होते. त्यानुसार पोलिसांनी तपासही सुरु केला होता. दरम्यान, शवविच्छदेन अहवालानंतर त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.