केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरींची घोषणा; वडगाव ते कात्रज रस्ता रुंदीकरण कामाचा शुभारंभ

कात्रज चौक येथे सातत्याने होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन या ठिकाणी सहापदरी उड्डाण पूल करण्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केली. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वार्षिक योजनेत या उड्डाण पुलाचा प्रस्ताव आल्यानंतर तातडीने मंजूर केला जाईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

वडगाव (नवले पूल) ते कात्रज रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ वरील ३.८८ कि.मी. रस्त्याचे सहा पदरीकरण आणि सेवा रस्त्यासह बांधकाम, रुंदीकरण कामाच्या कोनशिलेच्या अनावरणप्रसंगी गडकरी यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, की आंबेगाव बुद्रुक येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसृष्टी साकारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने या रस्त्यासाठी सेवा रस्त्यांसह इतर सुधारणा करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून झाली होती. हे काम ८० कोटी रुपयांचे आहे. मात्र, या कामासाठी अधिक निधी लागल्यास निश्चित दिला जाईल. कात्रज चौक येथे सहापदरी उड्डाण पूल करण्याची मागणी स्थानिक आमदार भीमराव तापकीर यांनी केली होती. ती मान्य करत १३५ कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देत आहे.

दरम्यान, वडगाव (नवले पूल) ते कात्रज दरम्यान ३.८८ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सहापदरीकरण आणि सेवा रस्त्यासह बांधकाम, रुंदीकरण या कामाला ६९ कोटी रुपये खर्च येणार असून काम पूर्ण होण्यासाठी अठरा महिने लागणार आहे. यात रस्त्याचे सहा पदरीकरण, सेवा रस्ते, पदपथ, लहान पूल, मोऱ्या, वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग, काही नवीन बांधकाम, लहान चौक सुधारणा, बस निवारा आदी कामे करण्यात येणार आहेत. आमदार भीमराव तापकीर, शिवेंद्रराजे भोसले, माजी आमदार योगेश टिळेकर, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम या वेळी उपस्थित होते.

उड्डाण पुलाला ध्वनिरोधक यंत्रणा

कात्रज चौकात होणाऱ्या सहापदरी उड्डाण पुलासाठी राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाची काही जागा घेण्यात येणार आहे. उड्डाण पुलामुळे तेथील प्राण्यांना त्रास होऊ नये म्हणून पुलावर ध्वनिरोधक यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातून जे पर्यटक आंबेगाव येथील शिवसृष्टीला भेट देण्यासाठी येतील, त्यांना सुविधा होण्यासाठी या दृष्टीने ही कामे तातडीने मंजूर केली आहेत, असेही गडकरी यांनी सांगितले.

स्थानिकांच्या सर्व मागण्या मान्य

खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी आपल्या मनोगतात वडगाव ते कात्रज रस्त्याच्या सहा पदरीकरण कामात स्थानिकांची गरज लक्षात घेऊन सातऐवजी दहा मीटर भुयारी मार्ग करावा, अन्य आवश्यक कामांसाठी अधिक निधी मिळावा, कात्रज चौकात सहा पदरी उड्डाण पूल करावा, अशा स्थानिकांच्या मागण्या असल्याचे सांगितले. त्यावर गडकरी यांनी आपल्या भाषणात सर्व मागण्या मान्य केल्याचे सांगितले.