हनुमान टेकडीवर महाविद्यालयीन तरुणीवर चोरटय़ाने बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच विश्रांतवाडी परिसरातील धानोरी येथे एका २४ वर्षीय संगणक अभियंता तरुणीवर शनिवारी (२७ फेब्रुवारी) तिच्या मित्रासह पाचजणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुंगीचे औषध देऊन हा प्रकार करण्यात आला. रविवारी (२८ फेब्रुवारी) पहाटे तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन या घटनेची माहिती दिली. तरुणीच्या मित्रासह सहाजणांना पोलिसांनी अटक केली असून आरोपींमध्ये एका तरुणीचा समावेश आहे.
पीडित तरुणीचा मित्र अभिनय साही (वय २८, मूळ रा. डेहराडून) तसेच आनंद ऊर्फ विष्णू प्रल्हाद चनार (वय २७, मूळ रा. केरळ, सध्या दोघे रा. श्रीहंसनगर, धानोरी), अभिजीत गोविंद देबराज (वय २५, मूळ रा. त्रिपुरा, सध्या रा. लिब्रोई पॅरेडाईज, खेसे पार्क, लोहगांव), देवदत्त प्रशांत दुबे (वय २४, मूळ रा. वाराणसी, उत्तर प्रदेश सध्या रा. भैरवनगर, धानोरी ), दीप्तांशु अखिलेशकुमार गुप्ता (वय २३, मूळ रा. छत्तीसगड, सध्या रा. स्नेहवर्धन सोसायटी, सहकारनगर) आणि तनुश्री हरबीनसिंग जग्गी (वय ३०, मूळ रा. छत्तीसगड, सध्या रा. संकल्पनगरी, धानोरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
आरोपी अभिनय साही आणि पीडित तरुणी हिंजवडीतील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहेत. शनिवारी कंपनीत स्नेहसंमेलन होते. त्यासाठी तरुणी मोटारीने अभिनयला हिंजवडीला घेऊन जाणार होती. त्यानुसार सायंकाळी पाचच्या सुमारास दोघे मोटारीने एबीसी फार्म रस्त्यावरील आयरिश व्हिलेज या हॉटेलमध्ये गेले. तेथे अभिनयने बिअर प्यायली, तर तरुणीसाठी शीतपेय मागविले. या दरम्यान ती प्रसाधनगृहात गेल्याची संधी साधून अभिनयने शीतपेयात गुंगीचे औषध टाकले. ते प्यायल्याने काही वेळानंतर तिला गुंगी आली. त्यानंतर अभिनय तिला मोटारीतून धानोरीच्या भैरवनगरमधील सोसायटीत घेऊन गेला. तेथे आरोपी आनंद, अभिजीत, देवदत्त, दीप्तांशु होते. त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
पहाटे दोनच्या सुमारास तरुणीला शुद्ध आली. मित्र अभिनय आणि त्याच्या साथीदारांनी बलात्कार केल्याचे उघड झाल्यानंतर ती मोटार घेऊन पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मुंढवा पोलीस ठाण्यात पोहोचली. तरुणीने तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती पोलिसांना दिली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करून जबाब नोंदविण्यात आला. पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त रवींद्र रसाळ, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जानमहंमद पठाण यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक फौजदार राजेंद्र जगताप यांनी  घटनास्थळाचा पंचनामा केला. तेथून तरुणीचे साहित्य जप्त करण्यात आले.
ती सदनिका हवाई दलातील अधिकाऱ्याची
संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार झाला ती सदनिका हवाई दलातील एका अधिकाऱ्याची असून आरोपी तेथे भाडेतत्त्वावर राहात होते, अशी माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. आरोपी अभिनय आणि त्याच्या चार मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे. बलात्काराचा प्रकार घडत असताना तनुश्री सिंग तेथे हजर होती. तिने गंभीर गुन्हा घडत असताना पोलिसांना माहिती दिली नाही. आरोपींना गुन्ह्य़ात मदत केल्याच्या आरोप पीडित तरुणीने फिर्यादीत केला आहे. त्यानुसार तनुश्री हिला पोलिसांनी अटक केली असून पोलीस निरीक्षक जानमहंमद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
विवाहितेला धमकावून बलात्कार करणारा अटकेत
विवाहितेला धमकावून बलात्कार केल्याप्रकरणी एकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली. पिसोळी परिसरात ही घटना घडली.
शेषराम रामदत्त मौर्य (वय ३५, रा. सुंदर आकाश सोसायटी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विवाहितेने या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विवाहितेचा पती हा आरोपी शेषराम याच्या कंपनीत कामाला आहे. ती पतीसोबत एका सोसायटीत भाडेतत्त्वावर राहायला आहे. पंधरा दिवसांपूर्वी तिचा पती कामावर गेला होता त्या वेळी शेषराम तेथे आला. विवाहिता एकटीच घरात होती. त्याने तिला धमकावून बलात्कार केला. या घटनेची पतीला माहिती दिल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर पुन्हा शेषराम विवाहितेच्या घरी आला. त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने या प्रकाराची माहिती पतीला दिली.
शनिवारी (२७ फेब्रुवारी) शेषराम हा विवाहितेच्या घरी आला. तिच्या पतीने त्याला जाब विचारल्यानंतर त्याला शेषराम याने मारहाण केली. विवाहितेने त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिसांनी शेषराम याला अटक  केली असून, रविवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.