‘रेडीरेकनर’मधील संभाव्य वाढ लक्षात घेता जुन्या दराने दस्त नोंदणी व मुद्रांक शुल्क भरण्यासाठी एकच झुंबड उडाल्याने नोंदणी खात्याच्या संकेतस्थळावर ताण येऊन राज्यभरातील नोंदणी कार्यालयांचे कामकाज बुधवारी विस्कळीत झाले. कार्यालयातील कामकाजाची वेळ वाढवून कामकाज सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र दस्त नोंदणी करता न आलेल्या नागरिकांनी रोष व्यक्त केला. दरम्यान, पुढील सात दिवस जुन्या दरानेच मुद्रांक शुल्क घ्यावे व संगणक प्रणालीतील तांत्रिक बिघाडाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी अवधूत लॉ फाउंडेशनने केली आहे.
नव्या वर्षांमध्ये रेडीरेकनरच्या दरामध्ये १५ ते २० टक्के वाढ होण्याची शक्यता असल्याने वर्षांच्या शेवटच्या दिवशी जुन्या दरामध्ये दस्त नोंदणी व मुद्रांक शुल्काच्या कामासाठी सकाळपासूनच नोंदणी कार्यालयामध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ‘ग्रास’ प्रणालीद्वारे मोठय़ा प्रमाणावर मुद्रांक शुल्क भरले जात होते. या संकेतस्थळावर एकाच वेळी राज्यभरातून अनेकांनी भेटी दिल्याने संगणक प्रणालीवर ताण येऊन ती काही काळ ठप्प झाली. त्यामुळे राज्यभरातील सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाज सकाळी साडेअकरापासून विस्कळीत झाले.
तांत्रिक कारणामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने पुढील सात दिवस जुन्या दरानेच मुद्रांक शुल्क घेण्यात यावे, अशी मागणी अवधूत लॉ फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. चंदन फरताळे यांनी नोंदणी महानिरीक्षकांकडे केली आहे. नोंदणी कार्यालयातील संपूर्ण संगणक यंत्रणा ठप्प झाली असून, मुद्रांक शुल्क भरण्याच्या ग्रास संगणक प्रणालीत गेल्यास ‘साईट अंडर मेंटनेस’ असा संदेश येत आहे. त्यातून संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे या बिघाडीची चौकशी व्हावी, अशी मागणी फाउंडेशनचे मार्गदर्शक श्रीकांत जोशी यांनी मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांकडे केली आहे.
सहमुद्रांक महानिरीक्षक संजय कोलते यांनी याबाबत सांगितले की, संकेतस्थळावर एकाच वेळी अनेकांनी भेटी दिल्याने काही वेळ प्रणालीत दोष निर्माण झाला होता. सध्या कामकाज सुरू आहे, मात्र वेग काहीसा कमी आहे. नागरिकांच्या सोईसाठी संध्याकाळी कार्यालयांच्या वेळा वाढविण्यात आल्या होत्या.