पुणे : शहराची वाढती लोकसंख्या आणि पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता मुळशी धरणातून पाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी घेण्याच्या प्रक्रियेला महापालिकेच्या स्तरावर गती मिळाली आहे. मुळशी धरणातून पाच टीएमसी पाण्याची मागणी करण्यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तयार करण्यात येत आहे. दरम्यान, राज्य शासनाने धरणातून पाणी घेण्यासंदर्भात माजी सनदी अधिकाऱ्यांची अभ्यास समिती स्थापन केली असून या समितीकडूनही येत्या काही दिवसांत अहवाल सादर होण्याची शक्यता आहे.

भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी पुणे शहरापासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळशी धरणातून पुणे शहरासाठी पाणी घेण्यासंबंधीचा विचार पालकमंत्री अजित पवार यांनी मांडला होता. त्यानुसार मुळशी धरणातून शहराला पाणी देता येईल का, याबाबत जलसंपदा विभागाने तांत्रिक चाचपणी करावी, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. या संदर्भात माजी सनदी अधिकारी अविनाश सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीही स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून व्यवहार्यता तपासणी करण्यात येत असून मे अखेरपर्यंत त्याबाबतचा अभ्यास अहवाल राज्य शासनाला मांडला जाण्याची शक्यता आहे.

या संदर्भात महापालिकेनेही त्यांच्या स्तरावर या प्रक्रियेला गती देण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वीही मुळशी धरणातून पाणी घेण्यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात जलसंपदा विभाग आणि महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठका झाल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने पाणी घेण्यासंदर्भातील ठराव स्थायी समितीपुढे मांडण्याचे निश्चित केले आहे. पाणीपुरवठा विभागाकडून तसा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो स्थायी समिती आणि मुख्य सभेच्या मान्यतेनंतर राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता मनीषा शेकटकर यांनी सांगितले.

दरम्यान, भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यामुळे शहराच्या पाणीकोट्यात कपात करण्याची भूमिका राज्याच्या जलसंपदा विभागाने घेतली आहे. भामा-आसखेड धरणातून २.५ टीएमसी पाणी महापालिका घेत आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून घेण्यात येत असलेल्या पाण्यात तेवढीच कपात करण्याची भूमिका जलसंपदा विभागाने घेतली आहे.

शहराचे भौगोलिक क्षेत्र वाढत आहे. महापालिका हद्दीत यापूर्वी ११ गावांचा समावेश करण्यात आला असून सध्या २३ गावांच्या समावेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याबाबतची अधिसूचनाही राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने काढली आहे. गावांचा समावेश महापालिकेत झाल्यानंतर या गावांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेवर राहणार आहे. त्यामुळे पाणीकोट्यात वाढ करण्याची मागणी महापालिकेने सातत्याने केली असून त्याबाबतचा प्रस्तावही प्रलंबित आहे. या पार्श्वभूमी  वर मुळशी धरणातून पाणी घेण्याच्या प्रक्रियेलाही गती देण्यात येत आहे.

योजना अशी आहे…

शहराची पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन मुळशी धरणातून पाणी घेण्यात येणार आहे. सध्या या धरणातील पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी के ला जात आहे. मुंबई शहराला या धरणातून निर्माण होणाऱ्या विजेचा पुरवठा केला जात आहे. या धरणातील पाण्याचा वापर केला जात नाही. त्यामुळेच या धरणातील पाणी घेण्याचे नियोजित आहे. वीजनिर्मितीनंतर पाणी समुद्रात सोडून देण्यात येत आहे. या पाण्याचा वापर करण्याची ही योजना आहे. बंद जलवाहिनीद्वारे पाणी शहरासाठी घेता येईल का, याचीही चाचपणी करण्यात येत आहे.