12 August 2020

News Flash

टेमघर दुरुस्ती डिसेंबरअखेर

 टेमघर धरण मुठा नदीवर मुळशी तालुक्यातील मौजे लव्हार्डे येथे बांधले आहे.

जलसंपदा विभागाची माहिती; धरण रिकामे करण्यास सुरुवात

शहराला पाणीपुरवठा करणारे टेमघर धरण रिकामे करण्याला गुरुवारपासून (१४ नोव्हेंबर) सुरुवात करण्यात आली. हे धरण रिकामे केल्यानंतर डिसेंबरअखेरपासून धरणाच्या दुरुस्तीची उर्वरित कामे जलसंपदा विभागाकडून सुरू करण्यात येणार आहेत.

टेमघर धरण मुठा नदीवर मुळशी तालुक्यातील मौजे लव्हार्डे येथे बांधले आहे. या धरणाचे बांधकाम २००० साली सुरू करून २०१०-११ पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात येत आहे. या धरणाची क्षमता ३.७१ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढी आहे. हे धरण पुणे शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी आणि मुळशी तालुक्यातील एक हजार हेक्टर सिंचनासाठी प्रस्तावित आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चार धरणांपैकी टेमघर धरण हे महत्त्वाचे धरण आहे. या धरणातून होणाऱ्या पाण्याची गळती रोखण्याचे काम सुरू आहे. सन २०१७ पासून गळती प्रतिबंधक कामांना सुरुवात झाली असून धरणाची ९० टक्के गळती रोखण्यात जलसंपदा विभागाला यश मिळाले आहे. ‘यंदा पावसाळ्यात हे धरण दोन वेळा भरून वाहिले होते. तसेच या भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाची गळती प्रतिबंधक कामे सुरू करता आली नव्हती. मात्र आता पडणारा पाऊस पूर्णपणे थांबला असून, खडकवासला धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने टेमघर धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडण्यास सुरुवात झाली आहे.

महिनाभरात धरण रिकामे करून धरणात ग्राउटिंग आणि शॉर्टक्रीट ही कामे हाती घेण्यात येणार आहेत,’ अशी माहिती पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी दिली. या वर्षांपासून या धरणातून जलविद्युत निर्मिती करण्यास देखील सुरुवात झाली आहे. या अनुषंगाने केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन संस्थेमार्फत प्रकल्पस्थळी आवश्यक वैज्ञानिक चाचण्या घेण्यात येत आहेत. मे २०२० अखेपर्यंत धरणातील गळती रोखण्यासाठी सुचवलेल्या अल्प मुदतीच्या उपाययोजना पूर्णत्वास आणून त्यानंतर दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत.

शासनाने या प्रकल्पावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमली असून समितीच्या मार्गदर्शनाखाली या हंगामात करायच्या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे, असेही कोल्हे यांनी स्पष्ट केले.

‘टेमघर पॅटर्न’ राज्यात

राज्यातील सर्वाधिक गळती असणारे धरण अशी ओळख असलेल्या टेमघर धरणाची गळती रोखण्यासाठी ग्राउटिंग आणि शॉर्टक्रीट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हेच तंत्रज्ञान वापरून कामे पूर्णत्वास येत आहेत. जलसंपदा विभागाच्या या प्रयत्नांना यश आले असून राज्यातील इतर धरणांमधील गळती रोखण्यासाठी टेमघर धरणाच्या धर्तीवर कामे करण्यात येणार आहेत, असे तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी चालू वर्षी ऑगस्टअखेर धरणाला भेट दिल्यानंतर सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2019 1:15 am

Web Title: temghor repairs by end of december akp 94
Next Stories
1 मुठा उजवा कालवा दुरुस्तीच्या उर्वरित कामांना प्रारंभ
2 अत्याचार प्रकरणातील पीडितांना आधार; ३४ लाख रुपयांची नुकसान भरपाई
3 भाजप नगरसेवकांचा ‘डल्ला’
Just Now!
X