News Flash

ऐन थंडीतही उन्हाळी आजार; श्वसनविकारांचाही त्रास

पुण्यात सोमवारी ९.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

दिवाळीनंतर तापमानात सतत होणारे चढउतार आणि मधूनच हुडहुडी भरवणारी थंडी अशा वातावरणात शरीरातील पाणी व क्षार कमी होण्यापासून ‘अ‍ॅलर्जी’मुळे होणाऱ्या श्वसनमार्गाच्या विविध आजारांपर्यंतचे रुग्ण बघायला मिळत आहेत. वास्तविक थंडीचे दिवस आजारांच्या दृष्टीने आरोग्यदायी समजले जातात आणि त्यानुसार डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची शहरातील संख्या तुलनेने कमी झाली आहे. तरीही एरवी साधारणत: उन्हाळ्यात दिसणाऱ्या ‘डीहायड्रेशन’, मुतखडा, मूत्रमार्गाचा संसर्ग अशा तक्रारी आता दिसत आहेत.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये चिकुनगुनियाचे १२३४ रुग्ण आणि डेंग्यूचे ६६२ संशयित रुग्ण सापडले होते. ही संख्या नोव्हेंबरमध्ये कमी झाली आहे. तरी गेल्या २१ दिवसांत चिकुनगुनियाचे ४६३ रुग्ण आणि २१५ डेंग्यूसदृश रुग्ण आढळले आहेतच.

ताप, घसा दुखणे, अंगदुखी, पाठदुखी या प्रकारची लक्षणे असलेले, परंतु डेंग्यू, चिकुनगुनिया व मलेरियाच्या चाचण्या ‘निगेटिव्ह’ येणारे रुग्ण अजूनही दिसत आहेत, असे फिजिशियन डॉ. कपिल बोरावके यांनी सांगितले. इतर आजारांबद्दल ते म्हणाले, ‘‘अशा वातावरणात वयस्कर मधुमेही रुग्णांमध्ये शरीरातील क्षारांचे (सोडियमचे) प्रमाण कमी होण्याची तक्रार या वर्षी दिसून येत आहे. हे एरवी एप्रिल-मे मध्ये आढळते. यात सोडियम कमी झाल्यामुळे असंबद्ध बडबड करणे, एकाग्रता कमी होणे, अधिक बोलणे किंवा एकदम शांत राहणे असे वागणुकीतले बदल दिसून येतात. काहींना रुग्णालयात दाखल करण्याचीही गरज भासते आहे.’’

थंडीतले धुके, धूळ, वाऱ्याचा कमी वेग आणि पुण्याच्या भौगोलिक स्थानामुळे या दिवसांत वाढणारे हवाप्रदूषणाचे प्रमाण यामुळे तसेच ऋतूबदलामुळेही ‘अ‍ॅलर्जी’च्या तक्रारी वाढल्याचे डॉ. विनय उपासनी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘शिंका, सर्दी, टाळूच्या वरच्या बाजूस खाज येणे, घसा खवखवणे, नाकाडोळ्यांतून पाणी येणे अशी लक्षणे ‘अ‍ॅलर्जी’मुळे दिसत असून त्याचे नवीन रुग्णही बघायला मिळत आहेत. अ‍ॅलर्जीचा त्रास होणाऱ्यांत पुढे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन विषाणूजन्य ताप, अंगदुखी, घसा लाल होणे अशीही लक्षणे असतात.

पुण्याला हुडहुडी!

पुण्यात सोमवारी ९.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहणार असून या काळात तापमानही १० अंश राहील, अशी शक्यता ‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’ने वर्तवली आहे. गुरुवारपासून पुढील चार दिवस किमान तापमान ११ अंशावर राहू शकेल. राज्यात सोमवारी सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे (८ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. त्याखालोखाल थंडीत नाशिकचा (९ अंश) क्रमांक लागला असून पुणे राज्यात किमान तापमानात तृतीय स्थानावर आहे.

वयस्कर मधुमेहींमध्ये शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी होणे, तसेच इतरांमध्ये मूत्रमार्गाचा संसर्ग व मुतखडय़ाचा त्रास हे एप्रिल व मे महिन्यात अधिक प्रमाणात दिसते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खरे तर हे आजार दिसायला नकोत, परंतु त्याचे रुग्ण बघायला मिळत आहेत. थंडीतही ‘डीहायड्रेशन’ होऊ शकते हे अनेकांना माहीतच नसल्यामुळे लोक या दिवसांत पुरेसे पाणी पीत नाहीत. शरीरातील पाणी कमी झाल्यामुळेच स्नायूंमध्ये पेटके (क्रँप) येणे, थकवा येणेही हेही त्रास होतात.

डॉ. कपिल बोरावके, फिजिशियन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 4:29 am

Web Title: temperature fluctuation leads to seasonal diseases in pune
Next Stories
1 जीवघेणी जलवाहिनी
2 शहरबात पुणे : कुरघोडीचे आणि श्रेयाचे राजकारण
3 एकच प्रभाग, एकच पक्ष अन् शेट्टी बंधूंचे त्रांगडे!
Just Now!
X