उत्तरेकडील बहुतांश राज्यात थंडीची तीव्र लाट आली असताना उत्तर मध्य महाराष्ट्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात तापमानात घट होत असली, तरी कडाक्याच्या थंडीतील ढगाळ वातावरणाचे विघ्न कायम आहे. तापमानात काही प्रमाणात घट झाल्यानंतर राज्यात हलक्या गारव्याची स्थिती आहे. ढगाळ वातावरण दूर होताच थंडीची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे.

कमी दाबाचे पट्टे आणि समुद्रातून होणाऱ्या बाष्पाच्या पुरवठय़ामुळे राज्यात थंडीला अडथळे निर्माण झाले. त्यामुळे कडाक्याची थंडी दीर्घकाळ राहू शकली नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात पावसाळी वातावरणात थंडी पूर्णपणे गायब होऊन रात्रीचे किमान तापमान जवळपास सर्वच भागांत १९ ते २० अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. सध्या राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली त्याचप्रमाणे मध्य प्रदेशातही काही ठिकाणी थंडीची लाट आली आहे. त्या भागातून राज्याकडे थंड वाऱ्यांचे प्रवाहही येत आहेत. मात्र, सध्या उत्तर महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचप्रमाणे दक्षिणेतही पावसाळी स्थिती आहे. त्यामुळे थंड वाऱ्यांचे प्रवाह अधिक प्रभावी ठरत नसल्याने राज्याच्या तापमानात एकदमच मोठी घट झाली नाही. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत मात्र तापमानात काही प्रमाणात घट झाल्याने रात्री हलका गारवा जाणवतो आहे.

उत्तरेकडील थंडीच्या लाटेची स्थिती तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. या कालावधीत उत्तर महाराष्ट्रातील ढगाळ स्थिती दूर झाल्यास तापमानात घट होऊन थंडीची तीव्रता वाढू शकेल.