शहरात जोरदार स्वरूपात मान्सूनपूर्व पाऊस झाला की, सेवा-सुविधा कोलमडण्याचा आणि रस्तोरस्ती पाणी साचण्याच्या प्रकाराचा परिपाठ यंदाही कायम राहिला असून रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात नेहमीच्या सर्व ठिकाणी पाणी साठून राहण्याचे प्रकार घडले. त्यामुळे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला आणखी अनेक कामे येत्या काही दिवसात करावी लागणार असल्याचेही स्पष्ट झाले.
पावसाळी कामांची तयारी म्हणून महापालिकेने खोदकामे तसेच रस्त्यांची इतर सर्व कामे यापूर्वीच बंद केली असून पावसाळापूर्व कामे गेल्याच महिन्यात सुरू करण्यात आली होती. या कामांमध्ये मुख्यत: पावसाळी गटारांमधील गाळ काढण्याच्या कामाचा समावेश होता. ही कामे सध्या विविध ठिकाणी सुरू असल्याचे दिसत असले तरी जोराचा पाऊस झाल्यानंतर शहराच्या विविध भागात पाणी साठण्याचे जे प्रकार घडतात त्याबाबत अद्याप विशेष उपाययोजना झाल्या नसल्याचे चित्र आहे.
शहराला रविवारी रात्री सुमारे तासभर मान्सूनपूर्व पावसाने झोपडून काढले. या पावसाने शहरात नेहमीच्या सर्व ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले. अनेक प्रमुख रस्त्यांवरील चौकांमध्ये पाण्याची तळी साठली होती. ज्या चौकांमध्ये नेहमी पाणी साचते त्या चौकांमध्ये पाणी साठणार नाही याबाबतची उपाययोजना करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाकडून नेहमीच सांगितले जात असले तरी तशा उपाययोजना झाल्या नसल्याचा अनुभव रविवारच्या पावसानंतर नागरिकांना आला. रस्ते, पदपथ आदींची कामे बंद असल्याचे महापालिकेकडून सांगितले जात असले तरी काही ठिकाणी नव्याने कामे सुरू होत असल्याचेही दिसत आहे. अशा कामांमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर तसेच पदपथांवर पाणी साठल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. त्या बरोबरच ज्या ठिकाणी सिमेंट रस्त्यांची वा अन्य कामे करण्यात आली आहेत तेथील राडारोडा अद्याप उचलण्यात आलेला नाही. तसेच काही कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे देखील अनेक रस्त्यांवर पाणी साठून राहण्याचे प्रकार शहरात घडले.