प्रवासासाठी आता ओला-उबरसारख्या वाहतुकीच्या सुविधांना प्राधान्य दिले जात असल्याने वाहन उद्योगाला विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागत असल्याचे वक्तव्य मागील आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. अर्थमंत्र्यांनी केलेलं हे वक्तव्य बेजबाबदारपणाचं असल्याचं म्हणत सरकारचा नाकरतेपणा झाकण्यासाठी ओला, उबरचं नाव पुढे केलं जात असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

शिवाय जबाबदार व्यक्तीकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती असेही चव्हाण यावेळी म्हणाले. पिंपरी-चिंचवडमधील पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. पुण्यासारख्या उद्योग नगरीत मुख्यमंत्री प्रचाराच्या निमित्ताने आले होते. पुणे, पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्र आहे या ठिकाणी सध्या मंदीचे वातावरण आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आर्थिक मंदीवर बोलणं अपेक्षित होतं. मंदीमुळे हाहाकार माजला आहे. हजारोच्या संख्येने लोकांचे रोजगार जात आहेत. वाहन कारखाने बंद पडले आहेत. यावर बोलणं महत्वाचं होत मात्र तस काही दिसलं नाही. आर्थिक मंदीबद्दल काही योजना नाही, काही घोषणा नाही, काय उपाय योजना कराल यावर काही बोललही जात नाही, असेही चव्हाण म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अर्थमंत्री सीतारामन यांनी केलेलं वक्तव्य हे बेजबाबदारपणाचे आहे, हे त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं. यापुढील उपाययोजना काय आहेत हे तुम्ही वाहन उद्योगाला सांगायला हवं. मात्र या ऐवजी तुम्ही जर ओला, उबर आले आहेत आता तुम्ही कारखाने गुंडाळा, तुमचा व्यवसाय काही चालणार नाही किंवा ओला-उबर बंद करावेत याचा परिणाम कारखान्यांवर होतोय असं जर तुम्ही तुमचा नाकारतेपणा झाकण्यासाठी म्हणत असाल तर हे चुकीचं आहे.

तसेच यापुढे ते म्हणाले की, तब्बल २६७ कार शोरूम बंद पडलेली आहेत. यात पुणे आणि मुंबई येथील १०० पेक्षा अधिक शोरूम्स आहेत. ही का बंद केल्या गेली? कारण गाड्या कोणी विकत घेत नाहीत. लोकं रडायला लागली आहेत, बँकेचे कर्ज मिळत नाही. यावर्षी बँकांचे ७३ हजार कोटींचे घोटाळे झाले आहेत. असा रिझर्व्ह बँकेने मागील आठवड्यात अहवाल दिला आहे. त्यातील ९० टक्के घोटाळा हा राष्ट्रीयकृत बँकेत झाला आहे. कोण चालवत आहे राष्ट्रीयीकृत बँका?  हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा कोण आश्रयदाते आहेत? याची माहिती द्या असे म्हणत सरकारचे अर्थव्यवस्थेवर अजिबात नियंत्रण राहिलेले नाही असाही त्यांनी यावेळी आरोप केला.