पुणे शहरात करोनाबाधित रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी तसेच मृत्यू पावलेल्या रुग्णांना स्माशानभूमीत घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याचा आरोप करत मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी सोमवारी पुणे महापालिकेचे व्हेईकल डेपोचे उपायुक्त नितीन उदास यांच्या वाहनाची तोडफोड केली.

वसंत मोरे म्हणाले, “पुणे शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात प्रशासन आणि सत्ताधारी भाजपा अपयशी ठरले आहे. शहरातील खासगी रुग्णालये पैसे उकळण्याचे काम करीत आहेत. या प्रश्नावर आजवर आम्ही महापालिकेच्या मुख्य सभेत आवाज उठविण्याचे काम केले आहे. मात्र, तरीदेखील सत्ताधारी आणि प्रशासन काहीच हालचाली करताना दिसत नाहीत.”

त्याही पुढे जाऊन रुग्णाला उपचारांसाठी रुग्णवाहिका किंवा एखाद्याचा मृत्यू झाल्यास स्मशानभूमीत घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकत नाही. यासाठी नातेवाईकांना तासन्-तास वाट पाहावी लागत आहे. रुग्णवाहिका मिळाली तरी रोजची मृतांची संख्या लक्षात घेता अंत्यसंस्कार करण्यास किमान चार तास लागतात. या आजाराच्या रुग्णांवर विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत. शहरात विद्युत दाहिनींची संख्या कमी असल्याने, अंत्यविधीसाठी लाकडांचा वापर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही यावेळी मोरे यांनी केली.

तसेच पुणेकर नागरिकांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देत नसाल, तर तुम्हालाही चांगल्या गाडीत फिरण्याचा अधिकारी नाही. यामुळे मनसे स्टाईलने अधिकाऱ्याची गाडी फोडण्यात आली आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यास यापुढेही ठिकठिकाणी असेच चित्र पाहण्यास मिळेल असा इशाराही वसंत मोरे यांनी दिला आहे.