दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांत पुण्यातील ९२ नागरिक सहभागी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या सर्वांचा ठाव-ठिकाणा लागला असून यातील काही लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या स्वाबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली.

महापौर मोहोळ म्हणाले, “प्राथमिक माहितीनुसार, दिल्लीतील कार्यक्रमाला जाऊन आलेल्या पुण्यातील लोकांची संख्या ही साधारण ९२ असण्याची शक्यता आहे. यातील काही जण पुण्यात पोहोचले आहेत तर काही जण अद्याप आलेले नाहीत. या लोकांचा शोध सुरु आहे. यातील बऱ्यापैकी लोकांची नावं, पत्ते मिळालेले आहेत. या लोकांना क्वारंटाइन केलेलं असून त्यांच्यावर उपचारही सुरु करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या स्वाबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, याचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.”

“आज जवळपास आपल्याकडे ३८ रुग्ण पॉझिटिव्ह होते. त्यातील ९ रुग्ण पूर्णपणे बरे झालेले आहेत. यातील एकाचा मृत्यूही झाला आहे. एका बाजूला रुग्णांची संख्या वाढतेय ही काळजीची गोष्ट आहे. त्याची चिंता केली पाहिजे. सुरुवातील फक्त परदेशातून आलेल्या व्यक्तींनाच किंवा त्यांच्या कुटुंबियांनाच करोनाचा संसर्ग होत होता. मात्र, आता ज्यांची परदेशातून आलेली पार्श्वभूमी नाही अशा लोकांना याचा संसर्ग होत आहे. यामध्ये झोपडपट्टी, सोसायट्यांमध्येही रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी याबाबत अधिक गंभीर होणं गरजेचं आहे. त्यासाठी विनाकारण घराच्या बाहेर पडू नका”, असं आवाहन यावेळी महापौर मुलरीधर मोहोळ यांनी केलं आहे.

दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमध्ये धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. एकूण आठ हजार लोक या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांच्यातील अनेकांमध्ये करोनाची लक्षणे दिसली आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्यांपैकी ३० जण करोना बाधित असल्याचे चाचण्यांत स्पष्ट झाले आहे. त्यातील तीन जणांचा काही दिवसांत मृत्यू झाला. या धार्मिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील अनेकजण सहभागी झाले होते. औरंगाबाद, अमरावती, पुणे यासह अनेक जिल्ह्यात कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचा शोध घेतला जात आहे.