चीनमध्ये सध्या ‘कोरोना’ या जीवघेण्या व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. तेथील अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे. तर हजारो नागरिकांना याची लागण झाल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. एवढेच नाहीतर केरळमध्ये देखील या जीवघेण्या व्हायरसची लागण झालेले आतापर्यंत तीनजण आढळले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, याच जीवघेण्या कोरोनाच्या जाळ्यातून चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेला सांरग शेलार हा विद्यार्थी सुखरूप परतला आहे.

या भयानक व्हायरसवर उपाय शोधण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. मात्र, तो कधी आटोक्यात येणार यावर कोणकडेच उत्तर नाही. त्यामुळे चीनमध्ये नोकरी तसेच उच्च शिक्षणासाठी गेलेले शेकडो भारतीय सध्या मायदेशी परतत आहेत. अशाचप्रकारे चीनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेला पिंपरी-चिंचवडमधील सारंग शेलार हा देखील परतला आहे. सुदैवाने त्याला या रोगाची लागण झालेली नाही. मात्र तरी देखील दक्षतेची बाब म्हणून तो दोन दिवसांपासून डॉक्टरच्या निगरानीत असून सध्या तो सुखरूप आहे. त्याला कोरोना व्हायरसची लागण झालेली नाही. सारंग ज्या शहरात शिकतो त्या ठिकाणी सध्या सर्वत्र शांततामय वातावरण आहे. याचबरोबर सर्वच बाजारपेठा देखील बंद ठेवण्यात आल्या असल्याची माहिती त्याने लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली.

सारंग म्हणाला की, चीनमध्ये शेनियांग हा शहरात मी राहतो. ज्या शहरात कोरोना व्हायरसने सध्या थैमान घातले आहे, ते मी राहतो त्या ठिकाणापासून १ हजार ८०० किलोमीटर दूर आहे. शेनीयांग या शहरात लागण झालेले ९ ते १० रुग्ण होते. दरम्यान, तिथे नवीन वर्षामुळे सुट्टी सुरू आहे. मात्र या भयानक व्हायरसमुळे सध्या तेथील नागरिक घाबरलेले आहेत. बाजार पेठांमध्ये नेहमी गर्दी असायची मात्र, या आता सर्व काही शांत आहे. तेथील अनेक दुकानं, बाजापरपेठा बंद आहेत. दररोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत नव्हत्या. तेथील नागरिक बाहेर पडण्यास घाबरत आहेत, अनेकजण मास्क लावून फिरतात. नागरिकांच्या मनात प्रचंड भीती आहे. परिस्थिती खूप गंभीर आहे.

कोरोना व्हायरसची भीती माझ्या मनात होती. पिंपरी-चिंचवड शहरातील माझ्या घरातील व्यक्ती मला नेहमी फोन करत होते. या सर्व गोष्टींचा मला ताण होत होता. चीनमध्ये घरातून बाहेर पडताना माझ्या मनात कायम एक भीती असायची की, आपल्याला तर लागण होणार नाही ना? अखेर माझ्यासह सात विद्यार्थांनी भारतात परतण्याचे ठरवले व आम्ही परतलो आहोत. सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील डॉक्टर माझी वैयक्तिक व किरकोळ तपासणी करत असून घरी सुखरूप परतल्याने आता सुरक्षित वाटत असल्याचेही सारंग यावेळी म्हणाला.