आपल्या राज्यातील पोलिसांनी करोना काळात खूप चांगले काम केले आहे. त्यामुळे भविष्यात करोनाचे प्रमाण कमी झाल्यास, पोलिसांच्या कामावर आधारीत कॉफी टेबल बुक तयार करणार आहे. त्यामुळे आपल्या जवळील माहिती आणि छायाचित्रांचे संकलन करावे, असे आवाहन रविवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला केले.

करोना नियंत्रणासाठी लॉकडाउनच्या कालावधीत पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीण पोलीस विभागाच्यावतीने करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या, यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) संदीप पाटील, पोलीस सहआयुक्त (शहर) डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त (पूर्व) सुनील फुलारी तसेच सर्व पोलीस उपायुक्त व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सायबर गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करा – गृहमंत्री

राज्यात मागील काही दिवसात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल करून, अशा व्यक्तींवर कडक कारवाई करावी, असे आदेशही यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पुण्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.

तसेच ते पुढे म्हणाले, लॉकडाउनच्या कालावधीत पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने पोलिसांच्या मदतीला ५ हजार ५०० विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा उत्कृष्ट उपक्रम राबविला आहे. यापुढेही हा उपक्रम सुरु ठेवावा, तसेच भविष्यात अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाल्यास हे आपल्यासाठी उपयोगी ठरेल. त्यामुळे या पार्श्वभूमीवर एक स्टँड ऑपरेटिंग प्रोसेजर तयार करून ठेवावी. या घटनेची प्रत्येक माहिती संकलित करून ठेवा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.