घर संसाराची आघाडी सांभाळत आवडत्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणारी, विज्ञान तंत्रज्ञान, आरोग्य, जाहिरात, मनोरंजन, संशोधन अशा सर्वच क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाची मोहोर उमटवणारी अशी ओळख संपादन करण्यात बदलत्या काळाबरोबर महिला यशस्वी झाल्या आहेत. ही ओळख प्राप्त करताना करावा लागणारा संघर्ष, द्यावा लागणारा हक्कांचा लढा आणि त्या निमित्ताने द्यावी लागणारी अग्निपरीक्षा हा प्रवास आजपासून सुरू होणाऱ्या लोकसत्ता बदलता महाराष्ट्र या कार्यक्रमातून उलगडणार आहे.

‘वर्ल्ड वेब सोल्युशन्स’ प्रस्तुत लोकसत्ता ‘बदलता महाराष्ट्र’ या दोन दिवसीय स्त्री विशेष उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ यांच्या हस्ते गुरुवारी (२८ मार्च) करण्यात येणार आहे. ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या उषा काकडे या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहाणार आहेत. ‘एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड’ या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत.

उपक्रमाच्या पहिल्या दिवशी (आज, गुरुवारी) ‘राजकारणातील स्त्री आरक्षणाचा फायदा नेमका कुणाला?’, ‘असंघटित स्त्रीशक्तीपुढील आव्हाने’, ‘काकूबाई ते मुक्त लैंगिक संबंध? – माध्यमातील स्त्री प्रतिमा : किती खरी किती खोटी’ या विषयांवर विचारमंथन होणार आहे. तर, शुक्रवारी (२९ मार्च) दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात ‘कॉर्पोरेट विश्व – संधी की आव्हानांचं?’, ‘बदलती जीवनशैली नातेसंबंधांना मारक?’ या विषयांवर चर्चा होणार आहे.

सुप्रसिद्ध निर्मात्या-दिग्दर्शिका आणि लेखिका सुमित्रा भावे यांच्या मुलाखतीने दोन दिवसांच्या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. उद्योग, राजकारण, मनोरंजन, कला, कायदा, आरोग्य अशा सर्व क्षेत्रांत काम करणाऱ्या महिला आणि पुरुषांशी या निमित्ताने संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी आहे.

दिवस पहिला (गुरुवार २८ मार्च)

सत्र पहिले – ‘राजकारणातील स्त्री आरक्षणाचा फायदा नेमका कुणाला?’

सहभाग- मुक्ता टिळक, वंदना चव्हाण, डॉ. नीलम गोऱ्हे

सत्र दुसरे – ‘असंघटित स्त्रीशक्तीपुढील आव्हाने’

सहभाग- किरण मोघे, मुक्ता मनोहर, उदय भट

सत्र तिसरे – ‘काकूबाई ते मुक्त लैंगिक संबंध? , माध्यमातील स्त्री प्रतिमा : किती खरी किती खोटी

सहभाग- विभावरी देशपांडे, क्षितिज पटवर्धन, सौरभ गोखले

दिवस दुसरा (शुक्रवार २९ मार्च)

सत्र पहिले – ‘कॉर्पोरेट विश्व – संधी की आव्हानांचं?’

सहभाग- रश्मी उर्ध्वरेषे, कांचन नायकवडी, परिमल चौधरी

सत्र दुसरे – ‘बदलती जीवनशैली नातेसंबंधांना मारक?’

सहभाग- डॉ. ऊर्जिता कुलकर्णी, डॉ. सुजला वाटवे, नीलिमा किराणे

सत्र तिसरे – निर्मात्या-दिग्दर्शक, लेखिका सुमित्रा भावे यांची

मुलाखत

मुलाखतकार – संध्या टाकसाळे