वाहनांच्या रांगा; पोलिसांकडून पर्यटकांवर कारवाई

लोणावळा/ पुणे : करोनाच्या संसर्गामुळे पर्यटनस्थळी बंदीचे आदेश लागू करण्यात आलेले असताना रविवारच्या सुटीचे औचित्य साधून वर्षांविहारासाठी पुणे-मुंबईतील पर्यटकांनी लोणावळा-खंडाळा परिसरात गर्दी केली. त्यामुळे लोणावळा शहरात वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांकडून संबंधित पर्यटकांवर कारवाई करण्यात आली.

लोणावळ्यात शनिवार आणि रविवारी पुणे तसेच मुंबईतील पर्यटक गर्दी करतात. करोनाच्या संसर्गामुळे पर्यटनबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पर्यटनबंदीचे आदेश धुडकावून रविवारी (१३ जून) पर्यटकांची लोणावळा आणि खंडाळा परिसरात झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. लोणावळा शहर पोलिसांनी त्वरित भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावरील नौसेना बाग परिसरात नाकाबंदी करून तेथे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना माघारी पाठविले. लोणावळा आणि मावळ तालुक्यात मोटारीतून हजारो पर्यटक दाखल झाले होते. त्यामुळे जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर चार ते पाच किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. भांगरवाडी रेल्वे फाटकाजवळील वाहनांची रांग नांगरगावपर्यंत गेली होती. मावळातील पवनमावळ आणि अंदरमावळ भागात पर्यटकांची गर्दी झाली होती. द्रुतगती मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली होती.

करोनाबाधितांची संख्या कमी झाली असली तरी पर्यटनबंदीचे आदेश कायम आहेत. पर्यटनबंदीचे आदेश धुडकावून गेल्या दोन दिवसांपासून लोणावळा आणि खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी होत आहे. वर्षांविहारासाठी गर्दी होत असल्याने या भागातील बंदोबस्तात वाढ करून वाहतूक कोंडी सोडविण्याची गरज आहे. ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयाकडून अतिरिक्त बंदोबस्त उपलब्ध करून दिल्यास आदेश धुडकावणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करणे शक्य होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

सिंहगडावर पुणेकरांची गर्दी

रविवारी सकाळपासूनच सिंहगड परिसरात पुणेकरांची गर्दी झाली होती. सिंहगड किल्ला, पानशेत, खडकवासला भागात मोठय़ा संख्येने पर्यटक दाखल झाले होते. करोना संसर्ग काळात पर्यटनस्थळावर झालेली गर्दी चिंताजनक आहे. त्यामुळे पुन्हा बाधितांचे प्रमाण वाढीस लागण्याची शक्यता आहे. मुळशी तसेच ताम्हिणी घाट परिसरातही रविवारी पर्यटकांची गर्दी झाली होती.