मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शनिवारी सकाळी मुंबईहून पुण्याकडे डाक पार्सल घेऊन निघालेल्या टेम्पोच्या केबिनला अचानक आग लागल्याने द्रुतगती महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी झाली.
खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याकडे येणाऱ्या डाक पार्सलच्या टेम्पोला (एमआर ५५ व्हि ५९५५) अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखत टेम्पो बाजूला घेतला. या घटनेची माहिती मिळताच आयआरबीच्या अग्निशमन पथकाने तातडीने ही आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली. तसेच खंडाळा महामार्गचे सहाय्यक निरीक्षक मोहन चाळके व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने हा टेम्पो क्रेनच्या साहाय्याने बाजूला नेला. या दरम्यानच्या काळात एक तास मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांची संख्या वाढल्यामुळे याच मार्गावर शुक्रवारी सकाळपासून वाहतुकीचा वेग मंदावला होता आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यातच शनिवारी या घटनेची भर पडली आणि त्यामुळे वाहतुकीचीही कोंडी झाली. वाहनांच्या वाढीव संख्येने शनिवारीही वाहनांचा वेग मंदावलेलाच होता.