मालमत्ता खरेदीसंदर्भात माझे सर्व व्यवहार पारदर्शी व कायदेशीर असून, त्यात कोणताही गैरव्यवहार करण्यात आलेला नाही, असे निवेदन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी प्रसिद्धिस दिले आहे.
देशमुख यांची मालमत्ता व जमिनींच्या खरेदीसंदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. माहिती अधिकारातील कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर आरोप केले होते. त्यात देशमुख यांनी पदाचा गैरव्यवहार केल्याचाही आरोप केला होता. या पाश्र्वभूमीवर देशमुख यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘मी व माझ्या कुटुंबीयांनी केलेले मालमत्ता खरेदी व्यवहार पारदर्शक व कायदेशीर आहेत. त्यात कोणताही गैरव्यवहार नाही. मी माझ्या पदाचा गैरव्यवहार केलेला नाही. सातारा जिल्ह्य़ातील जांभे येथे आपण ३०० एकर जमीन खरेदी केलेली नाही. लवळे येथे माझी पत्नी अनुराधा देशमुख यांना जमीन भेट मिळालेली नाही. त्यांनी २०११ मध्ये फडणीस यांच्याशी ४ कोटी रुपयांचा सौदा केलेला नाही. मी माझ्या मालमत्तेची माहिती आयकर विभागाला दिलेली आहे. त्यावर प्राप्तिकर भरलेला आहे. तसेच, माझ्या मालमत्तेची माहिती वार्षिक मालमत्ता विरवरणपत्राद्वारे शासनाला कळवलेली आहे.’