शाळाबस, खासगी प्रवासी वाहतूक बंद; मालवाहतूकदारांचा संप यापुढेही सुरूच राहणार

पुणे : ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने पुकारलेल्या देशव्यापी बेमुदत चक्का जाम आंदोलनाला एक दिवसासाठी शहरातील वाहतूकदार संघटनांनीही पाठिंबा दिल्याने शुक्रवारी शाळाबस आणि खासगी प्रवासी वाहतुकीतील वाहने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची आणि प्रवाशांचेही हाल झाले. मालवाहतुकीतील सर्व वाहनेही बंद ठेवण्यात आली होती. स्कूल बस आणि खासगी प्रवासी वाहतुकीतील बस शनिवारी सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, मागण्यांबाबत तोडगा निघेपर्यंत मालवाहतुकीतील वाहनांचा बंद सुरूच राहणार असल्याचे वाहतूकदारांकडून स्पष्ट करण्यात आले.

डिझेलचे दर कमी करावेत, राष्ट्रीय स्तरावर समान मूल्य ठरवावे, टोलमुक्त भारत करावा, एक राष्ट्र – एक परवानाअंतर्गत सर्व प्रकारच्या बस आणि पर्यटक वाहनांना राष्ट्रीय परवाना द्यावा आदी प्रलंबित मागण्यांसाठी चक्का जाम करण्यात येत आहे. पुणे आणि िपपरी- चिंचवड शहरामध्ये  पुणे बस ओनर्स असोसिएशन, पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशन, पिंपरी-चिंचवड बस ओनर्स असोसिएशन, पुणे जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटना, महाराष्ट्र राज्य वाहन-चालक मालक संघटना आदी संघटनांनी पुण्यातील बंदमध्ये सहभाग घेतला. सकाळी सहापासूनच बंद सुरू करण्यात आला. त्यामुळे स्कूल बस, कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या बस, खासगी प्रवासी बस आणि मालवाहतुकीतील सर्व प्रकारची वाहने जागीच उभी करण्यात आली होती. त्यामुळे अनेकांची गैरसोय झाली.

पुणे स्कूल बस ओनर्स असोसिएशनने देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा म्हणून एक दिवस त्यात सहभाग घेतला होता. स्कूल बससह कंपनी कर्मचारी आणि आंतरराज्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस मालकांनीही बंदमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, शनिवारपासून ही सर्व वाहने सुरू ठेवण्यात येणार आहेत, असे स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनावणे यांनी सांगितले. वाहने बंद ठेवून वाहतूकदारांनी शुक्रवारी पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य वाहन चालक- मालक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे, रिक्षा फेडरेशनचे बापू भावे, दत्ता आमले आदी त्या वेळी उपस्थित होते. दरम्यान, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस आणि पुणे विद्यार्थी वाहतूक संघाच्या वतीने शनिवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

पालकांना मनस्ताप; शाळांसमोर वाहनांची गर्दी

वाहतूकदारांच्या बंदमध्ये स्कूल बस चालकांनीही सहभाग घेतल्याने विद्यार्थी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना धावपळ करावी लागली. अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी स्वत:ची मोटार किंवा दुचाकीचा वापर केला. काही पालक विद्यार्थ्यांना रिक्षातून घेऊन आले. त्यामुळे बहुतांश शाळेसमोर पालकांची वाहने आणि रिक्षांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यामुळे शाळांच्या परिसरात आणि काही रस्त्यांवर वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली होती. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. बंदमुळे काही शाळांनी वेळेबाबत शुक्रवारी विद्यार्थ्यांना काहीसी सूट दिली होती. एकूणच सर्व प्रकारामुळे शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेला शाळांसमोर गोंधळाचे वातावरण होते. पाल्याची शाळेत ने- आण करण्यासाठी धावपळ, गोंधळ आणि त्यातच पावसाच्या सरींमुळे पालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.