बजाज ऑटो व्यवस्थापन आणि विश्वकल्याण कामगार संघटना यांच्यातील तिढा ४२ दिवसानंतरही सुटलेला नाही. त्यातच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी ‘कामगार सात दिवसांत रुजू न झाल्यास कंपनीचे निम्मे उत्पादन औरंगाबाद किंवा पंतनगर येथे कायमचे स्थलांतरित करू,’ असा इशारा दिला. कंपनी कामगारांना शेअर देण्याचा प्रश्नच नसल्याचे व्यवस्थापनाने पुन्हा स्पष्ट केले.
कामगारांना शेअर मिळावेत, कामगारांवर केलेल्या कारवाया मागे घ्याव्यात, नवीन करारावर बोलणी करावी, आदी मागण्यांसाठी विश्वकल्याण कामगार संघटनेचे २५ जूनपासून आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात, राजीव बजाज तसेच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप श्रीवास्तव, उपाध्यक्ष कैलाश झांजरी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यवस्थापनाची भूमिका स्पष्ट केली. १२ ऑगस्टपर्यंत हा तिढा सुटावा, त्यादृष्टीने कामगारांनी सकारात्मक दृिष्टकोन ठेवून रूजू व्हावे, अन्यथा कंपनीसमोर पर्याय राहणार नाही. यंत्रसामग्रीसह येथील ५० टक्के उत्पादन अन्यत्र स्थलांतरित करावे लागेल. त्यानंतर या ठिकाणी कामगारांची सध्या इतकी गरज भासणार नाही. त्यामुळे कामावर यायचे, अर्धा पगार घेऊन घरी बसायचे, स्वेच्छा निवृत्ती स्वीकारायची की नवीन नोकरी शोधायची याचा निर्णय कामगारांनी घ्यायचा आहे, असे ते म्हणाले.
दोषारोप असलेल्या २२ कामगारांबाबत ते म्हणाले की, सात कामगारांना लेखी माफीनामा व चांगल्या वर्तणुकीची हमी घेऊन दोन-चार दिवसांच्या निलंबनानंतर रूजू करून घेण्याची तयारी आहे. मात्र, उर्वरित १५ कामगारांची निवृत्त न्यायाधीश, वकील तसेच कामगार अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होईल. त्यात जे निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई होईल. निर्दोष कामगारांना कोणतीच शिक्षा होणार नाही. बंदमुळे कंपनीचे नव्हे तर घरी बसलेल्या कामगारांचे नुकसान होत आहे. आतापर्यंत आम्ही संयमाची भूमिका घेतली, आणखी वाट पाहण्याची तयारी आहे. त्यादृष्टीने पुढील सोमवारी पुन्हा आढावा घेऊ व त्यानंतर पुढील भूमिका ठरवू, असे सांगत २४ सप्टेंबरला संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
‘इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते’
रतन टाटा यांच्या नॅनो प्रकल्पाला तीव्र विरोध झाल्यानंतर त्यांनी पश्चिम बंगालला ‘गुड बाय’ केले. त्याची पुनरावृत्ती होऊ शकते, असे सूचक विधान राजीव बजाज यांनी या वेळी केले. टाटा मोटर्स व राजन नायर यांच्यातील संघर्षांचा तसेच बजाज कंपनीत यापूर्वी झालेल्या आंदोलनाचा सूचक संदर्भही बजाज यांनी आपल्या निवेदनात दिला.