दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सगळीकडे गुप्तचर यंत्रणांबरोबर पोलिसही सतर्क झाले आहेत. याच दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात एका महिला पोलीस कर्मचाऱ्यामुळे सगळ्यांचीच झोप उडाली. झालं असं की पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या बाहेर एक बेवारस बॅग आढळली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तर, मुख्य रस्ता असल्याने वाहनांच्याही रांगा लागल्या. बॅगेत काय असेल या भीतीनं घटनास्थळी बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आलं. त्यानंतर बॅग उघडण्यात आली, त्यात कपड्यांनी शिवाय काही नव्हतं. मात्र, महिला कर्मचारी ही बॅग विसरून गेल्याचं समजल्यानंतर पोलिसांनीही डोक्याला हात मारून घेतला.

पिंपरी-चिंचवड पोलीस उपायुक्त कार्यालया समोर शनिवारी साडेदहाच्या सुमारास फुटपाथवर एक मोठी बेवारस बॅग आढळली. तेथील पोलीस कर्मचाऱ्याने पिंपरी पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. दिल्लीमधील घटनेमुळे देशात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला असतानाच ही बॅग आढळून आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं होतं. त्यात, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मुख्य असल्याने तातडीने पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बेवारस बॅग बघून पोलिसांनी पुण्यातील बॉम्ब शोध व नाशक पथकाला बोलावलं. यादरम्यान मुख्य रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली. हा सर्व घटनाक्रम दोन तास सुरू होता. अखेर बॅग उघडण्यात आली. बॅगेत काही नसल्याचं समोर आलं आणि पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.

दरम्यान, बॉम्ब शोधक व नाशक पथक अधिकारी, पिंपरी पोलीस हे एका जागी थांबलेले होते. बॅगेत काही नसल्याचं समोर निष्पन्न झाल्यानंतर ज्या व्यक्तीची ती बॅग होती, तो त्या ठिकाणी पोहोचला. त्यांनी संबंधित बॅग त्यांच्या पत्नीची असून, त्या पुणे पोलिसात कार्यरत असल्याची माहिती दिली. पत्नी चार तारखेला यवतमाळला गेली होती. आज सकाळी ट्रॅव्हल्समधून प्रवास करत शहरात आली. सोबत काही वस्तू आणल्या होत्या. ट्रॅव्हल्स मधून उतरताच ती रिक्षा पकडून थेट घरी गेली, या धावपळीत संबंधित बॅग पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या समोर चुकून राहिली होती. ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी डोक्याला हात लावला.