गुडघ्याची शस्त्रक्रिया झाल्यामुळे बैठकव्यवस्था बदलली असली, तरी सूर मात्र जागेवरून हलले नाही याची प्रचिती घेत रसिकांनी प्रभाकर जोग यांच्या वादनातून ‘स्वरा’धीन झालेल्या व्हायोलिनची जादू सोमवारी अनुभवली. ‘ओ सजना बरखा बहार आयी’ या ‘परख’ चित्रपटातील गीताची सुरावट व्हायोलिनमधून येताच काहींनी त्या सुरांत आपलाही स्वर मिसळत अनोखी मैफल सजविली.
पुणे भारत गायन समाज संस्थेतर्फे प्रसिद्ध पाश्र्वगायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते प्रभाकर जोग यांना वसुंधरा पंडित पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, संगीतकार-गायक श्रीधर फडके, संस्थेच्या अध्यक्षा शैला दातार आणि पंडित यांच्या कन्या स्मिता कर्वे या प्रसंगी व्यासपीठावर होत्या. सव्वा रुपया आणि नारळ या बिदागीमध्ये पुण्यातील वाडय़ांतून केलेले व्हायोलिनवादन, सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचे सहायक म्हणून गीतरामायणातील योगदान, ‘लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतामुळे स्वतंत्र संगीतकार म्हणून झालेली ओळख अशा आठवणींना उजाळा देण्यात आला.
‘शुभंकरोति म्हणा मुलांनो’, ‘प्रिया आज माझी नसे साथ द्याया’, ‘हे चांदणे फुलांनी शिंपित रात्र आली’, ‘आज प्रीतीला पंख हे लाभले रे’, ‘हिल हिल पोरी हिला’ ही गीते सादर करीत अमेय जोग आणि दीपिका जोग या नातवंडांनी ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ या गीताची प्रचिती दिली. अनुराधा मराठे यांनी ‘चंद्रही आहे धूसर धूसर’, श्रीधर फडके यांनी ‘स्वर आले दुरुनी’ हे गीत सादर केले. तर, ‘कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे’ या गीतानंतर रसिकांच्या आग्रहास्तव सुरेश वाडकर यांनी ‘मेघा रे मेघा रे मत परदेस जा रे’ हे गीत गायले. ज्यांच्यामुळे मला संगीतकार होण्याची प्रेरणा मिळाली त्यामध्ये प्रभाकर जोग यांचा समावेश असल्याची भावना अशोक पत्की यांनी व्यक्त केली. शैला मुकुंद यांनी सूत्रसंचालन केले.