News Flash

निर्बंधांमुळे भाजीपाला संकटात

मुबलक आवक; विक्री कमी, शेतकऱ्यांना तोटा

(संग्रहित छायाचित्र)

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीत भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी चार तास सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कडक निर्बंधात भाजीपाल्याची आवक मुबलक होत असली, तरी अपेक्षित मागणी नसल्याने आणि भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. लग्नसराईतील उपस्थितीवर निर्बंध, तसेच राज्यभरातील उपाहारगृहे, खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या बंद आहेत. त्याचा परिणाम  भाजीपाला विक्रीवर झाला आहे. अपेक्षित खरेदी होत नसल्याने भाजीपाला वाया जाण्याचेही प्रमाण वाढले आहे.

राज्यभरातील घाऊक भाजीपाला बाजारात होणाऱ्या गर्दीला वेसण घालण्यासाठी प्रशासनाने बाजार आवाराच्या कामकाजांसाठी नियमावली लागू केली. पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील घाऊक भाजीपाला आणि गूळ-भुसार बाजार आठवड्यात शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस बंद ठेवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत घाऊक बाजारात शेतीमाल विक्रीस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतीमाल नाशवंत असल्याने विक्री न झालेला माल परत घेऊन जाता येत नाही. निर्बंधामुळे किरकोळ खरेदीदार हात आखडता ठेवून भाजीपाला खरेदी करत आहेत. एरवी दोन ते तीन पोती भाजीपाला घेणारा किरकोळ बाजारातील भाजीपाला विक्रेता खरेदी कमी प्रमाणात करतो आहे. किरकोळ भाजीपाला विक्री दुकानांवर वेळेचे बंधन असल्याने खरेदीच्या प्रमाणात घट झाली आहे, अशी माहिती मार्केटयार्डात भाजीपाला विक्रीस घेऊन आलेल्या शेतक ऱ्यांनी दिली. ग्राहकांना भाजी स्वस्त मिळत असली तरी, निर्बंधांमुळे भाजीपाल्याच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात भाजीपाल्याची विक्री करावी लागत आहे.

१५ ते २० टक्के शेतमाल वाया

वाशीतील नवी मुंबई कृषी बाजार समितीत मुंबई, ठाणे परिसरातील किरकोळे विक्रेते खरेदीसाठी येतात. मात्र, भाजीपाल्याची अपेक्षित खरेदी होत नाही. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीस पाठविण्यात आलेल्या भाजीपाल्यापैकी १५ ते २० भाजीपाला खराब होत असल्याची माहिती बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी दिली.

घरगुती ग्राहकांच्या तुलनेत पुणे-मुंबईतील हॉटेलचालक, खाद्यपदार्थ विक्रेते, खाणावळ चालकांकडून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. लग्नसराईवर निर्बंध आहेत. त्यामुळेही भाजीपाल्याच्या मागणीत घट झाली आहे. परिणामी शेतक ऱ्यांना घाऊक बाजारात आणलेल्या भाजीपाल्याला अपेक्षित भाव मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. किरकोळ बाजारातील खरेदीदारांकडून भाजीपाल्याच्या मागणीत घट झाली आहे. गेल्या वर्षी टाळेबंदीमुळे राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. यंदा निर्बंध असले तरी नियमावलीचे पालन करून भाजीपाला खरेदी-विक्री व्यवहार सुरू आहेत.

– विलास भुजबळ, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते संघटना, पुणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 12:28 am

Web Title: vegetables in crisis due to restrictions abn 97
Next Stories
1 लसीकरण पुन्हा ठप्प
2 कठोर निर्बंधांनंतरही संचार सुरूच
3 कळवा विटावा भागात आज वीजपुरवठा खंडित
Just Now!
X