कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार लढणार होते. मात्र, विजयसिंह मोहिते-पाटलांना माढ्यातून उमेदवारी द्यावी, असे बैठकीत शरद पवार यांनी सांगितले होते. त्यानंतर काही दिवसात अनेक वेळा विजयसिंहांना अनेकदा फोन केला. मात्र, त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही आणि भाजपमध्ये प्रवेश केला, असा खुलासा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. मात्र, आता माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा चेहरा दिसेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुणे शहराचा मेळावा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार जयदेव गायकवाड, शहरअध्यक्ष चेतन तुपे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पवारांनी सुजय विखेंबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, अहमदनगरच्या जागेवरून सुजय विखेंशी देखील आमची चर्चा झाली होती. मात्र, माशी कुठं शिंकली कळलंय नाही.

यावेळी कार्यकर्त्यांना अजित पवारांनी प्रोत्साहित करण्याचे काम केले. ते म्हणाले, राज्यात चार टप्प्यात मतदान होणार असल्याने प्रत्येक कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करावा. निवडणूक कालावधीत महिनाभर रात्री उशिराच घरी जा. जे सूर्यमुखी असतील त्यांनी सकाळी लवकर उठा. दुपारच्या वेळी सहकाऱ्यांसोबतच जेवा, महिनाभर वामकुक्षी सोडा. स्वतःचा भाग सोडून थेट राज्याच्या पातळीवर प्रचारासाठी जाऊ नका, केवळ लग्न आणि साखरपुड्यांना हजेरी लावून प्रचार करू नका. आपल्या पक्षाला किंवा उमेदवाराला त्रास होईल, अशी विधाने करू नका असा सल्लादेखील त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

राफेल प्रकरणावर बोलताना पवार म्हणाले, केंद्र सरकारने ५४० कोटींचे विमान १६०० कोटीला का खरेदी केले यावर सरकार स्पष्टीकरण देत नाही. राफेल प्रकरणाची कागदपत्र गहाळ झाली आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकर्‍यांच्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या झाल्या आहेत. यावर सरकारने मागील साडे चार वर्षात कोणताही उपाय केला नाही, अशा शब्दांत त्यांनी केंद्रीतील भाजपा सरकारवर टीका केली.