स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त चिखली येथील स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने ९ ते १२ जानेवारी दरम्यान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या स्वामी विवेकानंद पुरस्कारांचे वितरण माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराजे बेंबडे यांनी ही माहिती दिली. दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत होणाऱ्या या व्याख्यानमालेत शुक्रवारी नरेंद्र पाठक यांचे ‘भारत कधी कधी माझा देश आहे’, शनिवारी डॉ. यशवंत पाटणे यांचे ‘जीवन त्यांना कळले हो’, रविवारी गणेश शिंदे यांचे ‘स्वामी विवेकानंद व आजचा युवक’, सोमवारी विवेक वेलणकर यांचे ‘नागरिक हो, सजग व्हा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. समारोपाच्या दिवशी मंगला शहा, स्वप्नील पोरे, लीलाधर वराडे, संजय शहा, स्मिता पाटील, शीतल चव्हाण, कु. वैष्णवी जरे, गिरिधर काळे यांना हर्षवर्धन पाटील व आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते स्वामी विवेकांनद पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
रविवारी बानुगडे यांचे व्याख्यान
दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने रविवारी (११ जानेवारी) सायंकाळी साडेपाच वाजता चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहात ‘आजचा युवक – उद्याचे भवितव्य’ या विषयावर प्रा. नितीन बानुगडे यांचे व्याख्यान होणार आहे. महापौर शकुंतला धराडे व माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड यांच्या हस्ते बानुगडे यांचा या वेळी ‘युवागौरव’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गोरख भालेकर यांनी दिली.