परीक्षांच्या तोंडावर उच्च माध्यमिक शिक्षकांनी दिलेल्या बहिष्काराच्या इशाऱ्यामुळे बारावीच्या परीक्षांवर बहिष्काराचे सावट असताना आता राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आता १३ फेब्रुवारीपासून राज्यातील शाळा बेमुदत बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षांवरही सावट आहे.
राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतरांच्या विविध सहासंघटनांनी सोमवारी शिक्षक संचालनालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनात राज्यातील दीड ते दोन हजार शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यातील सर्व शाळा १३ फेब्रुवारीपासून बेमुदत बंद करण्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे. त्यामुळे बारावीपाठोपाठ दहावीच्या परीक्षांवरही अडचणींचे सावट आहे.

प्रमुख मागण्या
– कायम विनाअनुदानित शाळांमधील कायम शब्द वगळावा
– मध्यान्ह भोजन योजनेची जबाबदारी मुख्याध्यापकांवर टाकू नये
– सहावा वेतन आयोग लागू व्हावा
– शिक्षकेतरांना बारा आणि चोवीस वर्षांनंतर विनाअट वेतनश्रेणी मिळावी
– शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सेवेत आपली शैक्षणिक पात्रता वाढवल्यास त्याला शिक्षक पदावर विनाअट संवर्ग बदलून मिळावा