नव्या वर्षांचे स्वागत करताना नागरिकांकडून डॉल्बी, स्पीकर वापरून, फटाके वाजवून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाकडे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि पोलीस यांनी लक्ष ठेवावे. तसेचस, संबंधितांवर कारवाई करावी, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिले आहेत.
याबाबत डॉ. रवींद्र भुसारी यांनी याचिका दाखल केली होती. नवे वर्ष साजरे करताना नागरिकांकडून मध्यरात्री १२ वाजता व त्यानंतर मोठय़ा प्रमाणात ध्वनिप्रदूषण केले जाते. वाहनांचे हॉर्न, फटाके, डॉल्बीसारखी यंत्रणा वापरून कर्कश्श संगीत वाजवले जाते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. ते टाळण्यासाठी उपाय व्हावेत या उद्देशाने ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर हरित न्यायाधिकरणाचे न्यायमूर्ती विकास किनगावकर आणि डॉ. अजय देशपांडे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायाधिकरणाने हे आदेश दिले.
यावर नियंत्रण आणण्यासाठी आरटीओ आणि पोलीस यंत्रणा यांनी एकमेकांशी समन्वय साधावा. ध्वनिप्रदूषण करणारी वाहने जप्त करावीत. त्यासाठी आवश्यकता भासल्यास शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा उपयोग करावा, असेही न्यायाधिकरणाने म्हटले आहे.
यावर याचिकाकर्ते डॉ. भुसारी यांनी, नवीन वर्ष साजरे करताना सामाजिक वागणुकीला वळण लावणारा हा निकाल आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.