पिंपरी पालिकेने २४ तास पाणी देण्याची घोषणा केली असली तरी पाणीटंचाईवरून गावोगावी होणारी ओरड कायम असल्याचे पुन्हा दिसून आले आहे. चऱ्होली व लगतच्या १२ वाडय़ा-वस्त्यांना गेल्या आठ दिवसांपासून पाणी नसल्याने स्थानिक नगरसेविका विनया तापकीर यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. पाणीच मिळत नसेल तर गावकऱ्यांनी टॅक्स का भरावा, असा मुद्दा उपस्थित करून त्यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ स्थायी समितीची सभा अर्धा तास तहकूब ठेवणे भाग पाडले.
चऱ्होली गावठाण, चोविसावाडी, वडमुखवाडी, साईनगर, जगताप वस्ती, काटे वस्ती आदी भागात गेल्या आठ दिवसांपासून ऐन सणासुदीच्या काळात पाणी मिळत नाही. येथील जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला, तो पूर्ववत झालाच नाही. दुरुस्तीची कामे होतात पुन्हा पाईप फुटतात, असे चक्र सुरू आहे. पाणी सोडले जात नाही, सोडले तर ते कमी दाबाने येते. अवघ्या १५ मिनिटात पाणीपुरवठा बंद होतो, असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे हैराण आहेत, अशी व्यथा विनया तापकीर यांनी स्थायी समिती बैठकीत मांडली. कार्यकारी अभियंता जयंत बरशेट्टी यांनी साचेबध्द उत्तर देत याविषयी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. त्यावर तापकीर यांचे समाधान झाले नाही. येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास स्थायी समितीची सभा होऊ न देण्याचा इशारा त्यांनी दिला. तत्पूर्वी, पाणीपुरवठा विभागाच्या निषेधार्थ अर्धा तास सभा तहकूब करण्यात आली.