महाराष्ट्रातील प्रमुख धरणांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या घाटमाथ्यांवर गेले चार-पाच दिवस दमदार पाऊस पडल्यामुळे राज्यातील धरणांच्या साठय़ात काहिशी वाढ झाली आहे. त्यामुळे विशेषत: कोकण आणि पुणे विभागाला थोडा दिलासा मिळाला आहे. इतर भागात मात्र अजूनही धरणांच्या साठय़ात विशेष वाढ झालेली नाही. दरम्यान, आता पावसाचा जोर ओसरला असून, त्यात वाढ होण्यासाठी येत्या मंगळवारची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्या सुमारास बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे.
राज्यात पावसाची चांगली सुरुवात व्हायला तब्बल दीड महिन्यांचा विलंब झाला. त्यानंतर गेल्या आठवडय़ाभरात चांगला पाऊस पडला. विशेषत: घाटमाथ्यांवर त्याचा जोर चांगला होता. आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत अम्बोणे येथे तब्बल ३२० मिलिमीटर पाऊस झाला. याशिवाय ताम्हिणी (२९० मिलिमीटर), लोणावळा (२८०), माथेरान (१८०), खोपोली (१८०), महाबळेश्वर (१७०), कोयना (१६०), इगतपुरी (१३०), गगनबावडा (१२०) येथेही मोठय़ा पावसाची नोंद झाली. गुरुवारी दिवसभरातही मराठवाडा वगळता इतरत्र अनेक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी त्याची नोंद झाली.
या पावसामुळे कोकण व पुणे विभागातील धरणसाठय़ांत वाढ झाली. आठवडय़ापूर्वी कोकण विभागातील धरणांमध्ये २८ टक्के साठा होता, तो वाढून गुरुवारी ३८ टक्क्य़ांवर पोहोचला. पुणे विभागातील धरणांमधील पाणीसाठा आठवडय़ाभरात १२ वरून १६ टक्क्य़ांवर गेला. नाशिक, मराठवाडा, नागपूर, अमरावती या विभागांमध्ये मात्र पाणीसाठय़ात विशेष वाढ झाली नाही.
मान्सूनने देश व्यापला
मोसमी वारे (मान्सून) गुरुवारी कच्छ व राजस्थानच्या वाळवंटात दाखल झाले. अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण देश व्यापला. हे वारे सामान्यत: १५ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतात, या वर्षी त्याच्याच आसपास त्यांनी देश व्यापला आहे.
राज्यात गुरुवारी सकाळपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पडलेला पाऊस असा (मिलिमीटरमध्ये)-
पुणे ५, कोल्हापूर ५, महाबळेश्वर ६०, नाशिक २, सांगली १, सातारा ५, मुंबई-कुलाबा ६, सांताक्रुझ १४, रत्नागिरी १०, डहाणू १, भीरा ७८, अकोला ३, अमरावती ३, बुलडाणा ७, ब्रह्मपुरी १०, गोंदिया ३, नागपूर ३, वर्धा ३, यवतमाळ २५.