आता रचनात्मक काम करण्याची वेळ आली असून फक्त निवडणूका म्हणजे पक्ष कार्य नव्हे, अशी ताकीद मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील कार्यकर्ता आणि पदाधिकारी मार्गदर्शन मेळाव्यात दिली. वाढदिवसाचे बॅनर लावत फिरण्यापेक्षा लोकांशी सरळ संपर्क साधून त्यांच्यापर्यंत पक्ष पोहचविण्याचे काम करा. वाढदिवसाचे बॅनर लावल्यास पदावरून हकालपट्टी केली जाईल. यापुढे कोणतीही बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. पक्ष वाढीसाठी तुमच्याकडे काही रचनात्मक बाबी असल्यास सरळ माझ्याशी connetctrajthackeray@gmail.com या नव्या ई-मेलवर माझ्याशी सरळ संपर्क साधावा. यापुढे पक्षाने आखून दिलेली चौकट पाळावीच लागेल, असा सज्जड दम राज ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला.
निवडणुकांचे निकाल काहीही लागले तरी राज्यातील जनता आपल्याकडे आशेने पाहत आहे. जनतेत मिसळून त्यांना काय हवे आहे हे विचारले पाहिजे. हातात मतदार यादी असून उपयोग नाही तर लोकांचा डेटाही आपल्याकडे असला पाहिजे, असेही ठाकरे यांनी या वेळी सांगितले. आता जे झाले ते पुरे झाले यापुढे पक्षात बेशिस्तपणा खपवून घेतला जाणर नाही. बेशिस्तपणा करणाऱयांना घरचा रस्ता दाखविणार असल्याचा इशारा ठाकरे यांनी दिला.