माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा यंदाच्या अहवालातील निराशाजनक सूर, कर्मचाऱ्यांची घसरती कामगिरी या प्रमुख कारणांमुळे येत्या दोन महिन्यांत पुण्यात काम करणाऱ्या अडीच लाख आयटी कर्मचाऱ्यांपैकी दहा ते पंधरा हजार जणांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड पडण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या कपातीस सुरुवातही झाली असून कामावरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ लवकरच कामगार आयुक्तांची भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या दशकभरात पुण्यातील आयटी सेक्टर फोफावले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी येथे ठाण मांडले, सध्या अडीच लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना हे क्षेत्र रोजगार पुरवते. मात्र गेल्या काही महिन्यांतील बाजारातील आर्थिक निराशेचा परिणाम या क्षेत्रावर झाला आहे. येत्या दोन महिन्यांत पुण्यात पाच मोठय़ा आयटी कंपन्यांमधून जवळपास दहा ते पंधरा हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची शक्यता असून काही आयटी कर्मचाऱ्यांना चांगल्या कामगिरीनंतरही राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले आहे. यातील काही कर्मचाऱ्यांनी फोरमशी संपर्क साधला असून त्यांच्या प्रश्नांबाबत संघटना गांभीर्याने प्रयत्न करणार असल्याची माहिती ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज’ (एफआयटीई) या देशपातळीवरील संघटनेचे महासचिव विनोद ए. जे. यांनी दिली.

‘आयटी कंपन्यांचे अहवाल यंदा सर्वसाधारणत: उत्साहवर्धक नसून व्यवसाय कमी होणार असल्याने कंपन्यांना कमी मनुष्यबळ लागेल असे दिसून येते. ‘आयटी’ क्षेत्राविषयीच्या धोरणांपेक्षा वेगाने तंत्रज्ञान बदलण्याचा परिणाम या क्षेत्रावर अधिक होतो. वीस-पंचवीस वर्षे वा अधिक अनुभव असलेल्या मंडळींना नवीन कौशल्ये आत्मसात नसल्यामुळे त्रास होऊ शकेल. त्यांचा पगारही खूप जास्त असतो. नव्याने नोकरीस लागणाऱ्या मुलांना तीन महिने प्रत्यक्ष कामाशिवाय प्रशिक्षण व पगार देणे शक्य होईल का, हाही एक प्रश्न आहे. परंतु ही नवीन मुले आणि अनुभवी कर्मचारी स्टार्ट-अपकडे वळण्याचा विचार करतील, असे मत ‘कॉर्पोरेट’ कंपन्यांना व्यावसायिक सल्ला देणाऱ्या ‘लेगालॉजिक’ या वकिली फर्मचे सहसंस्थापक विवेक साधले यांनी व्यक्त केले.

‘नॅसकॉम’चे प्रादेशिक प्रमुख प्रसाद देवरे म्हणाले की, ‘जागतिक स्तरावर ‘आयटी’ क्षेत्रात मंदी आहे असे म्हणता येणार नाही, तसेच मोठय़ा प्रमाणावर कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाईल, ही अफवा असून त्याने नकारात्मकता वाढू शकते.’  ते म्हणाले, ‘पुढील आर्थिक वर्षांतही (२०१८) आयटी क्षेत्रात नोक ऱ्या उपलब्ध होणार आहेत. लहान व मध्यम आकाराच्या कंपन्या चांगली कामगिरी करीत असून लहान उत्पादन कंपन्याही चांगल्या चालल्या आहेत. ’

‘फोर्ज अहेड सोल्युशन्स’चे प्रमुख कार्यकारी अधिकारी अश्विन मेघा म्हणाले,  ‘आयटी’ क्षेत्रात मंदी नाही. मोठय़ा कंपन्यांमध्ये गरजेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीत घेतले जाते. अशा काही लोकांना नोकरी गमवावी लागू शकेल. परंतु कोणतीही कंपनी उत्तम काम करणाऱ्या व्यक्तीस हातचे जाऊ देत नाही.’’

कौशल्य विकसनाची गरज

‘सध्याचा काळ कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्याचा असतो. पुण्यात जवळपास दोन लाख व्यक्ती माहिती तंत्रज्ञानात काम करीत असून त्यातील काहींना नोकरी गमवावी लागू शकेल, परंतु त्याचा संबंध या क्षेत्रातील मंदीशी नसून कामातील कौशल्याशी आहे,’ असे मत ‘फाइव्ह एफ वर्ल्ड’चे संस्थापक गणेश नटराजन यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘पुढील तीन वर्षांत या क्षेत्रातील १० लाख नोक ऱ्यांच्या जागी नवीन १५ लाख नोक ऱ्या तयार होतील. या नव्या नोक ऱ्यांसाठी वेगळ्या प्रकारची कौशल्ये लागतील. पुण्यात जवळपास एक लाख आयटी कर्मचाऱ्यांनी कौशल्य विकसनास सुरुवात करायला हवी.’’

कुणाची नोकरी धोक्यात?

ज्या कर्मचाऱ्यांची कामगिरी फारशी चांगली नाही, किंवा ज्या कर्मचाऱ्यांना सात वर्षांपेक्षा अधिक किंवा १५-२० वर्षांचा अनुभव आहे, परंतु जे स्वत:ला बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर अद्ययावत ठेवत नाहीत, त्यांची नोकरी धोक्यात येऊ शकेल, असे या क्षेत्रातील अनुभवी मंडळी सांगत आहेत. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे हे कर्मचाऱ्यांसमोरचे आव्हान असले तरी नोकरीवरून काढलेल्यांना त्यांच्या कामगिरीनुसार कंपन्या ३ ते ६ महिन्यांचा पगार देत आहेत, तसेच त्यांपैकी बहुतेकांना दुसरीकडे नोक ऱ्याही मिळत आहेत, असेही त्यांचे म्हणणे आहे.