गाडीला कट मारल्याचे कारण देत वाद घालून पुण्यातील एका ख्यातनाम कंपनीच्या संचालकाचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. पोलिसांच्या धाकापायी आरोपींनी संचालकाला चौफुलाजवळ सुखरुप सोडून दिले आणि तिथून धूम ठोकली. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका कंपनीचे संचालक हे मंगळवारी संध्याकाळी कारमधून धायरीच्या दिशेने जात होते. कारमध्ये संचालक आणि चालक असे दोघे जण होते. त्यांची कार चऱ्होली येथे पोहोचताच दुचाकीवरुन दोन तरुण आले आणि त्यांनी दुचाकी कारसमोर थांबवली. दुचाकीला कट का मारली, यावरुन त्यांनी कारच्या चालकाशी वाद घातला. यानंतर चालकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली आणि संचालकाचे अपहरण केले.
घटनेची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळताच सर्व यंत्रणा सतर्क झाली. घटनेबाबत गुप्तता बाळगण्यात आली. दिघी पोलिसांच्या चार पथकासह, गुन्हे शाखा, खंडणी विरोधी पथक, सायबर सेलचे अधिकारी कामाला लागले. शहरात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली.पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. दोन्ही आरोपी चौफुलाच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्या मागावर पोलिसांचे पथक होते.
तेवढ्यात संचालकानेच पोलिसांना फोन करुन सुखरुप असल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींनी त्यांना चौफुलाजवळील ढाब्याजवळ सोडून धूम ठोकली होती. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड हे अधिक तपास करत आहेत. दरम्यान अपहरणाचा कट हा पूर्वनियोजित असल्याचं पोलीस तपास समोर येत आहे.