पुणे : शहरात दहशत माजविणाऱ्या दहा गुंडांना तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी दिले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली. पुणे शहर, पिंपरी – चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून सराइतांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अनिकेत गुलाब यादव (वय २२) आणि प्रसाद उर्फ बाबु धनाजी सोनवणे (वय २१) यांना तडीपार करण्यात आले असून त्यांच्या विरोधात दरोडा, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेला विश्वजीत भीमराव गायकवाड (वय ४०) हा गावठी दारू विक्री करतो. गायकवाड याला तडीपार करण्यात आले आहे. कोंढवा भागातील गुंड करीम सय्यदअली सौदागर उर्फ लाला (वय २९) आणि त्याचे साथीदार शाहरुख रमजान पठाण उर्फ फतेह (वय २५), अझहर बशीर शेख (वय ३५), अझहर इरफान शेख उर्फ अज्जु (वय २८) यांच्याविरुद्ध मारहाण, धमकी, गंभीर दुखापत, चोरी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, बेकायदा शस्त्र बाळगणे असे सात गंभीर गुन्हे नोंद दाखल आहेत. या टोळीला तडीपार करण्यात आले आहे.
वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराइत राहुल उर्फ विकी परदेशी (वय ३५) याच्यासह विशाल राजू सोनकर (वय २६), सुनील रामू परदेशी (वय ३०) यांना तडीपार करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध गंभीर दुखापत, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, विनयभंग, मालमत्तेचे नुकसान, धमकावणे, मारहाण आणि दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग करून गुंड शहरात येतात. आदेशाचा भंग करणारा गुंड आढळून आल्यास त्वरित पाेलीस नियंत्रण कक्ष (११२) किंवा परिमंडळ पाचचे कार्यालय (दूरध्वनी – ०२०-२६८६१२१४) या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी केले आहे.
गुंडांना धडा
पुणे पोलिसांच्या परिमंडळ पाचच्या हद्दीतील मुंढवा, कोंढवा, लोणी काळभोर, हडपसर, वानवडी भागात गुन्हेगारीचे प्रमाण मोठे आहेत. परिमंडळ पाचमधील १६ गुन्हेगारांविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली असून, त्यांना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. परिमंडळ पाचमधील ६७ गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. ३१ गुंडांना तडीपार करण्यात आले आहे.