पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे जीवनसाधना गौरव पुरस्कार घाऊक प्रमाणात दिले जात आहेत. त्यामुळे हे पुरस्कार बंद करून पूर्वीची डी.लिट. पदवी देण्याची पद्धत पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांत योगदान दिलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी जीवनसाधना गौरव पुरस्कार देण्यात येतात. त्यानुसार यंदा दहा मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या वर्षीही दहा मान्यवरांना गौरवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर माजी अधिसभा सदस्य प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी घाऊक प्रमाणात दिले जाणारे जीवनसाधना गौरव पुरस्कार देणे थांबवून डी.लिट. पदवी देण्याची पद्धत पुन्हा सुरू करण्याची मागणी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली आहे.

विद्यापीठाकडून डी.लिट. पदवी देण्याची पद्धती १९९९ पर्यंत अस्तित्वात होती. मात्र, काही वादविवाद झाल्यामुळे ही पदवी देण्याची पद्धत बंद करून जीवनसाधना गौरव पुरस्कार सुरू करण्यात आले. त्यानुसार गेली २५ वर्षे हे पुरस्कार देण्यात येतात. विद्यापीठ कायद्यानुसार व्यवस्थापन परिषद, अधिसभा, कुलपतींची मान्यता घेऊनच डी.लिट. पदवी दिली जात होती.

जीवनसाधना गौरव पुरस्कार देण्यासाठी व्यवस्थापन परिषदेत निश्चित पद्धतीपेक्षा विविध नावांचा आग्रह धरला जातो. ही बाब योग्य नाही. त्यामुळे समाजातील कर्तृत्ववान व्यक्तीच्या कार्याचा गौरव करण्यासाठी डी.लिट. पदवी देण्याची कायदामान्य पद्धत पुन्हा सुरू करावी. त्यामुळे पुरस्कारांची गुणवत्ता टिकून वाढलेली संख्या कमी होईल, असे प्रा. कुलकर्णी यांनी सांगितले. या बाबतची मागणी विचारात घेतली जाईल, असे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी डी.लिट. पदवी दिली जाते. त्यासाठी काहीएक शैक्षणिक पात्रता असण्याचे बंधन नाही. ज्या व्यक्तींचे कार्य मोठे आहे आणि उच्च शिक्षणाची संधी मिळाली नाही, त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ हा बहुमान देणे योग्य ठरते. त्यातून विद्यापीठाचा समाजाशी असलेला संबंध अधिक दृढ होतो. विद्यापीठाने डी.लिट. देण्याची पद्धत बंद केलेली असली, तरी ती पुन्हा सुरू करता येऊ शकते, असे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. भूषण पटवर्धन यांनी सांगितले.