पुणे : बँकाँकहून हायड्रोपोनिक गांजा विक्रीसाठी घेऊन आलेल्या चैाघा प्रवाशांना सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम) पथकाने पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर पकडले. प्रवाशांकडून १३ किलो ७२५ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले प्रवासी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, गुजरातमधील बलसाड, तसेच पालघर जिल्ह्यातील आहेत. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधी रुपये किंमत आहे.
आलिया इलियास अन्सारी (वय २४), मोहम्मद कैफ अन्सारी (वय २३, रा. सोनाजीनगर, मुंब्रा), जहिदहुसेन शेख (वय २९, रा. किल्ला परडी, जि. बलसाड, गुजरात), झैबुनिसा अमिन शेख (वय ४६, रा. धानानी नगररोड, बोईसर जि,पालघर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अन्सारी आणि शेख हे बँकाँकहून विमानाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. चौघे जण विमानतळावर घाईघाईत बाहेर पडत हाेते. कस्टमच्या पथकाला संशय आला. त्यांच्याकडे असलेल्या सामानाची तपासणी करण्यात आली. तेव्हा बॅगेतून तीव्र वास येत होता. कस्टमच्या पथकाने बॅगेची तपासणी केली. तेव्हा पाकिटात हिरवट रंगाचा प्रक्रिया केलेला गांजा सापडला. आरोपींकडून हवाबंद केलेली गांजाची २६ पाकिटे जप्त करण्यात आली.
चैाकशीत विमानतळाबाहेर झैबुनिसा शेख ही थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. झैबुनिसाने त्यांना बँकाँकहून गांजा आणण्याची जबाबदारी सोपविली होती. कस्टमच्या पथकाने तिला ताब्यात घेतले. अन्सारी आणि शेख यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय ‘रॅकेट’
आरोपींकडून जप्त करण्यात आलेला हायड्रोपोनिक गांज्याची लागवड नियंत्रित वातावरणात करण्यात येते. या गांजाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधी रुपये आहे. आरोपींनी गांजा बँकाँकहून आणला आहे. गांजाची विक्री कोणाला करणार होते, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. गांजाची तस्करी आंतराष्ट्रीय पातळीवर होत असून, सखोल तपास करण्यात येत असल्याची माहिती कस्टमचे विशेष सरकारी वकील ऋषीराज वाळवेकर यांनी युक्तिवादात दिली.
न्यायालायने आरोपींना न्यायालयाीन कोठडी सुनावली आहे. कस्टमचे (एअर इंटेलिजन्स युनिट) अधिकारी प्रिन्स कुमार तपास करत आहे. हायड्रोपोाेनिक गांजाची परदेशातून तस्करीचे प्रकार वाढीस लागले आहे. यापूर्वी शहरातून हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला होता. या गांजाची किंमत साध्या गांजापेक्षा जास्त असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.