पुणे : पुणे महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामधील चितळ प्रजातीच्या १५ हरणांचा मृत्यू झाला. यामध्ये मादी चितळांची संख्या अधिक आहे. त्यांचा मृत्यू नक्की कशाने झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

‘प्राणी संग्रहालयातील चितळांचा मृत्यू साथीच्या आजारामुळे झाला, की विषबाधेमुळे याचा तपास केला जात आहे. न्याय वैद्यकीय परीक्षण अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल,’ अशी माहिती प्राणी संग्रहालयाचे प्रमुख राजकुमार जाधव यांनी दिली. पुणे महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये ९९ चितळ आहेत. गेल्या आठवड्यापासून सलग एक-दोन चितळांचा मृत्यू होत आहे. आतापर्यंत १५ चितळांचा मृत्यू झाला आहे.

‘अचानकपणे इतक्या मोठ्या संख्येने चितळ दगावल्याने प्राणी संग्रहालय प्रशासनदेखील दक्ष झाले आहे. मृत चितळांचा व्हिसेरा परीक्षणासाठी नागपूर येथील वन्यजीव प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतरच चितळांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. तूर्तास उर्वरित चितळांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे,’ अशी माहिती जाधव यांनी दिली.

कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयामध्ये चितळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यापैकी काही चितळ लवकरच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार आहेत. तूर्तास चितळांचे प्रजनन रोखण्यासाठी प्राणी संग्रहालय प्रशासनाने मादी आणि नर चितळांना वेगवेगळ्या पिंजऱ्यांत ठेवले आहे. यापैकी साथीच्या आजारामुळे मादी चितळांचे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याची शक्यता जाधव यांनी व्यक्त केली.

गेल्या काही दिवसांपासून चितळांचा मृत्यू होत आहे. मृत चितळांचा व्हिसेरा परीक्षणासाठी नागपूर येथील वन्यजीव प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर निश्चित कारण स्पष्ट होईल. – राजकुमार जाधव, प्रमुख, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, पुणे महापालिका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विविध प्रयोगशाळांत तपासणी

‘मृत प्राण्यांच्या शरीराचे अवयव आणि रक्ताचे नमुने तपासणीसाठी बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेतील ‘नॅशनल रेफरल सेंटर फॉर वाइल्ड लाइफ डिसीज मॉनिटरिंग अँड प्रीव्हेन्शन’, भुवनेश्वर (ओडिशा) येथील ‘आयसीएआर’चे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन फूट अँड माउथ डिसीज’, भोपाळ येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीज’, पुण्यातील औंध येथील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, नागपूर येथील गोरेवाडा मधील विभागीय वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र या सर्व ठिकाणी पाठवण्यात आले आहेत. तसेच, संग्रहालयातील उर्वरित चितळांच्या आरोग्य आणि उपचारासंबंधी बरेलीच्या संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांशी तसेच प्राणीसंग्रहालयांच्या आरोग्य सल्लागार समितीतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे,’ असे राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाचे संचालक डाॅ. राजकुमार जाधव यांनी सांगितले.