पुण्यातून विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांची वाढलेली संख्या आणि पुण्याहून होणाऱ्या विमान उड्डाणांमध्ये झालेली वाढ, या पाश्र्वभूमीवर पुण्याच्या विमानतळाची क्षमता वाढवण्याचा गेली १५ वर्षे चर्चेत असलेला मुद्दा अखेर निकाली निघाला आहे. लोहगाव विमानतळाला लागून असलेली लष्कराची १५ एकर जागा विमानतळाला देण्यास संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली असून, आणखी ६ ते ८ एकर जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
गडकरी यांनी लोहगाव विमानतळाच्या जागेची रविवारी पाहणी केली. यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. लोहगाव विमानतळासाठी २२ एकपर्यंत जागा मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून ही क्षमतावाढ पुढील जास्तीत जास्त ६ ते १० वर्षेच पुरी पडू शकेल, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले,‘विमानतळ विकास प्राधिकरणाने प्रथम संरक्षण मंत्रालयाकडे ४ एकर जागेची मागणी करण्याचे ठरवले होते. परंतु ती जागा तुटपुंजी असल्यामुळे सध्याच्या विमानतळाच्या पुढे असलेली १५ एकर जागा लष्कराकडून भाडेतत्त्वावर मिळावी असे सुचवले. ही जागा देण्याचे संरक्षण मंत्रालयाने मान्य केले आहे. विमानतळाजवळ एका ठिकाणी लष्कराचे विमानचालन उपकरण बसवण्यात आले आहे व तिथपासून ३०० मीटरचा परीघ मोकळा सोडावा लागतो. या उपकरणाच्या आजूबाजूची ३५० मीटर जागा सोडून त्याच्या पुढे असलेली आणखी ५ ते ८ एकर जागा विमानतळाला मिळावी यासाठी मी संरक्षण मंत्रालयाशी चर्चा करीन.’
विमानतळाच्या आजूबाजूला १०० मीटर क्षेत्रात बांधकाम करता येत नसल्यामुळे या पट्टय़ातील जागा विमानतळासाठी मिळवण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त प्रस्ताव तयार करतील, असेही ते म्हणाले.
‘नवीन विमानतळाची बैठक १५ दिवसांत’
‘पुण्यासाठीच्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय राज्याचा असून त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. १५ दिवसांत मुंबईत सरकारकडून नव्या विमानतळासाठी बैठक बोलवली जाईल,’ अशी माहितीही गडकरी यांनी दिली. ते म्हणाले,‘विमानतळाची क्षमता वाढवणे हा कायमचा उपाय नव्हे. ते फार तर ६ ते १० वर्षे चालेल. येत्या ८ ते १० वर्षांत नवीन विमानतळ बांधून पूर्ण करता येऊ शकेल. पुढच्या ६ महिन्यांत नवीन विमानतळाच्या जागेबाबत निर्णय करावा लागेल.’
क्षमतावाढीचा आराखडा सादर करण्याच्या सूचना
आताच्या विमानतळाचे कार्यालय, वाहनतळ अशी बांधकाम झालेली जागा, नवीन १५ एकर जागा आणि ५ ते ८ एकर प्रस्तावित जागा जमेस धरुन एक नवीन आराखडा तयार करण्याच्या सूचना विमानतळ विकास प्राधिकरणाला देण्यात आल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. ते म्हणाले,‘विमानतळासाठीचे वाहनतळ भूमिगत स्वरुपात करण्याची सूचना केली असून उपलब्ध जागेचा अधिकाधिक वापर विमानतळाच्या वापरासाठीच व्हावा’
लष्कराचे दोनशे प्रकल्प पर्यावरण खात्याकडून पास!
संरक्षण मंत्रालयाच्या २०० प्रलंबित प्रकल्पांना एका निर्णयात पर्यावरण खात्याची सर्वसाधारण मंजुरी देण्यात आल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. ते म्हणाले. ‘या बदल्यात संरक्षण मंत्रालयानेही देशातील विविध २०० प्रकल्प मंजूर करावेत अशी चर्चा झाली आहे.’
