पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यमध्ये बुधवारी रात्री झालेल्या बेफाम पावसाने हाहाकार उडवून दिला. शहर आणि जिल्ह्यामध्ये भिंत पडून आणि पाण्याच्या लोंढय़ात वाहून गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला. सहा ते सात नागरिक बेपत्ता झाले आहेत. शेकडो जनावरांचाही मृत्यू झाला. प्रामुख्याने दक्षिण पुणे आणि सिंहगड रस्ता परिसरात बहुतांश सोसायटय़ांमध्ये पाणी शिरले, सीमाभिंती कोसळल्या, नाल्यांमधून आलेल्या पाण्याच्या लोंढय़ाने मोटारींसह हजारो दुचाकी वाहून गेल्या. पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक मार्ग असलेल्या नाल्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांत बांधकाम व्यावसायिकांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांचा फटका निष्पाप नागरिकांना बसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

शहरामध्ये सहकारनगर, अरण्येश्वर भागात टांगेवाला कॉलनीत एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळून एकाच ठिकाणी पाच जणांचा मृत्यू झाला. सहकारनगर भागात वीर सावरकर सोसायटीत पाण्याच्या लोंढय़ात बंगल्याची भिंत कोसळली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. सिंहगड रस्ता भागात एक दुचाकीस्वार महिला आणि मोटारचालक बांधकाम व्यावसायिक मोटारीसह वाहून गेले. केळेवाडी पुलावरून एक मोटार पाण्यात   वाहून गेली. ती गुरुवारी संध्याकाळी नाल्यामध्ये सापडली. मात्र, त्यातील तीन तरुण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कात्रज येथील स्मशानभूमीजवळ पाण्यात वाहून आलेल्या मोटारीत एकाचा मृतदेह सापडल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

टांगेवाला वसाहतीतील गंगातीर्थ सोसायटीतील सीमाभिंत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेला बांधकाम व्यावसायिक जबाबदार असल्याचा आरोप रहिवाशांनी केला.

सीमाभिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने सीमाभिंत कोसळल्याचे रहिवाशांनी सांगितले. पुरंदर तालुक्यात एक ज्येष्ठ महिला आणि २२ वर्षांची तरुणी पाण्यात वाहून गेली. हवेली तालुक्यात सहा जण पाण्यात वाहून गेले आहेत. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. शहर आणि जिल्ह्यमध्ये लहान आणि मोठी अशा एकूण आठशेहून अधिक जनावरांचाही पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे.

शहरात २३ आणि २४ सप्टेंबरला रात्री धुवाधार पावसाने हजेरी लावली होती. २४ सप्टेंबरला रात्री सुरू झालेला पाऊस २५ सप्टेंबरला सकाळपर्यंत कायम होता. या पाण्याचा निचरा होण्यापूर्वीच २५ सप्टेंबरला रात्री बेफाम पाऊस झाला. त्यामुळे दक्षिण पुणे आणि सिंहगड रस्ता परिसरातील बहुतांश भाग पाण्याखाली जाऊन हाहाकार उडाला. त्यानंतर रात्री एकापाठोपाठ शहरात घडलेल्या भीषण दुर्घटनांमुळे पोलीस, अग्निशमक दल तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाकडून (एनडीआरएफ) तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. बेफाम पावसाने शहराची अक्षरश: दैना झाली. रस्ते वाहून गेले तसेच सहकारनगर भागात गायी वाहून गेल्या. कात्रज भागात पाण्याचा एवढा जोर होता, की जवळपास ५० दुचाकी वाहून गेल्या. वारजे, सिंहगड रस्ता, किरकिटवाडी, कोल्हेवाडी, वानवडी, धनकवडी, पद्मावती, अरण्येश्वर, सहकारनगर, आंबेगाव, नऱ्हे भागातील अनेक सोसायटय़ांमध्ये पाणी शिरले. कात्रज भागातून दक्षिण पुण्यातील धनकवडी, बिबवेवाडी, सहकारनगरच्या दिशेने जाणाऱ्या नाल्यांना पूर आल्याने या भागातील अनेक वसाहतीत पाणी  शिरले.

वीज, पाणी, गॅसविना नागरिकांचे हाल

बुधवारी रात्री धुवाधार पावसामुळे काही ठिकाणी वीजयंत्रणा वाहून गेली. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी वीजयंत्रणा पाण्याखाली गेल्याने बुधवारी रात्रीपासूनच वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक ठिकाणी गुरुवारी संध्याकाळपर्यंत वीज पूर्ववत झाली नव्हती. त्यामुळे सोसायटय़ांना इमारतीवरील टाक्यांमध्ये पाणी चढविता न आल्याने पाण्याविना नागरिकांचे प्रचंड हाल झाले. वीज नसल्याने चार्जिगअभावी मोबाइल संचही बंद पडले. बिबवेवाडी आणि सिंहगड रस्ता भागामध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या गॅस वाहिन्यांचे नुकसान झाल्याने या भागातील गॅस पुरवठाही बंद होता.

भिंत आणि पाण्याच्या लोंढय़ाने जीव घेतला

सहकारनगर भागातील अरण्येश्वर येथील टांगेवाला वसाहतीत शंभर बैठी घरे आहेत. या भागातील नाल्याचे पाणी रात्री नऊनंतर वसाहतीत शिरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नागरिक बाहेर पडू लागले. गंगातीर्थ सोसायटीच्या इमारतीच्या परिसरातून रात्री अकराच्या सुमारास या भागातील रहिवासी बाहेर पडत असताना अचानक भिंत कोसळली. त्यात जान्हवी जगन्नाथ सदावर (वय ३०), श्रीतेज जगन्नाथ सदावर (वय ८), रोहित भरत आमले (वय १४), संतोष सहदेव कदम (वय ५५) आणि लक्ष्मीबाई शंकर पवार (वय ६९) यांचा मृत्यू झाला. सहकारनगर भागातील वीर सावरकर सोसायटीत रात्री अकराच्या सुमारास तळजाई डोंगरावरून आलेल्या पाण्याचा लोंढय़ामुळे बंगल्याची भिंत कोसळली. या घटनेत वंदना विकास अतीतकर (वय ५५) यांचा मृत्यू झाला. ज्योत्स्ना संजय राणे (वय ३५) या पाण्यात वाहून गेल्याने मृत्युमुखी पडल्या. पाण्यात वाहून गेल्याने अमृता अनंद सुदामे (वय ३५, रा. नांदेड सिटी) या  दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. वडगाव येथील उड्डाण पुलाजवळ पाऊस सुरू झाल्यानंतर त्या आडोशाला थांबल्या होत्या. तेथून काही अंतरावर असलेल्या प्रयेजा सिटीजवळील ओढय़ाला पूर आल्याने बांधकाम व्यावसायिक किशोर दत्तात्रय गिरमे (वय ५५, रा. आसावरी, नांदेड सिटी, सिंहगड रस्ता) हे मोटारीसह वाहून गेले. नागराज बाळकृष्ण भील (वय २२), सुमन अदिनाथ शिंदे (वय ६६), राजेंद्र विठ्ठल राऊत (वय ५०), साईनाथ सोपान भालेराव (वय ३५), गौरी श्याम सूर्यवंशी (वय १४), धर्मनाथ मातादीन भारती प्रसाद (वय २५) यांचाही पूरस्थितीत मृत्यू झाला. खेड शिवापूर येथील दग्र्याचा परिसरात पाच जण वाहून गेले. त्यातील एका अनोखळी व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.