पिंपरी : दिवाळीतील ऐन लक्ष्मीपुजनाच्या पहाटे वाकडमधील विद्युत दुचाकीच्या पत्र्याच्या शेडच्या सर्व्हिस केंद्रामध्ये आग लागली. मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत ६० विद्युत दुचाकी जळून खाक झाल्या. दुचाकी चार्जिंगसाठीच्या बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, पिंपरीत सोळा तासांत १७ आगीच्या घटना घडल्या आहेत.
वाकड येथील शेडगे वस्तीत एका इमारतीत विद्युत दुचाकी शोरूम आणि एका कंपनीचे इलेक्ट्रिक दुचाकी सर्व्हिस केंद्र आहे. शोरूम आणि दुचाकी सर्व्हिस केंद्राच्या मध्ये एक हॉटेल आहे. मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पत्र्याच्या शेडच्या सर्व्हिस केंद्रामध्ये अचानक मोठी आग लागली. सर्व्हिस केंद्रामध्ये कोणी कर्मचारी नव्हते.
काही नवीन तर काही दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकी सर्व्हिस केंद्रामध्ये होत्या. आग लागताच शेजारील हॉटेलातील कर्मचारी यांनी बाहेर धाव घेतली. आगीची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्य अग्निशमन दल, रहाटणी, नेहरूनगर आणि थेरगाव अग्निशमन केंद्रातून सहा बंब त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
जवानांनी तातडीने परिस्थितीची तपासणी केली आणि वाहनांच्या बॅटरी आणि हॉटेलातील सिलिंडरचा संभाव्य स्फोट रोखण्यासाठी काळजीपूर्वक उपाययोजना केल्या. सर्व्हिस केंद्राजवळ उच्च दाब विद्युत वाहक तार असल्याने जवानांनी प्रथम विजतारेच्या जवळ आग पसरू नये यासाठी सुरुवातीला वीजपुरवठा खंडित केला आणि तेथील आगीवर नियंत्रण मिळवले. या विद्युत वाहक तारेमुळे जवानांना अडथळ्यांचा सामना करावा लागला. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले. या आगीत ६० विद्युत दुचाकी जळून खाक झाल्या.
सोळा तासांत १७ आगीच्या घटना
पिंपरी-चिंचवड शहरात २० ऑक्टोबर रोजी दुपारी पावणेबारा ते पहाटे पावणेचार या सोळा तासांच्या कालावधीत ठिकठिकाणी आगीच्या १७ घटना घडल्या. १७ ते २० ऑक्टोबर या चार दिवसांत आगीच्या २९ घटना घडल्या. शुक्रवारी मोरवाडी, चिखली, भोसरी येथे तर शनिवारी प्राधिकरण, चिखली, वाकड येथे रविवारी सांगवी, मोशी, नवी सांगवी, रावेत, थेरगाव गावठाण, शिवाजीवाडी, मोशी, निगडी येथे तर सोमवारी पूर्णानगर, चिंचवड, संत तुकारामनगर, पिंपरी, प्राधिकरण, निगडी, पिंपळे सौदागर, यमुनानगर, निगडी, रहाटणी, वाकड, थेरगाव गावठाण, रहाटणी, मोरवाडी, भोसरी, पुनावळे, पिंपरी बाजार, रहाटणी, जाधववाडी, चिखली, प्रेमलोक पार्क, चिंचवड, वाकडमधील शेडगे वस्ती येथे दुचाकी सर्व्हिस केंद्राच्या पत्र्याच्या शेडला आग लागली. विद्युत वाहने असल्याने आग विझवण्यासाठी ‘फोमिंग’ पद्धत वापरली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग कशी लागली याबद्दल चौकशी केली जाईल. प्राथमिक माहितीनुसार, आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, अशी शक्यता अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले यांनी व्यक्त केली.