गर्भलिंग निवडीविरोधात तक्रार नोंदवण्यासाठीच्या ‘आमची मुलगी’ या शासनाच्या संकेतस्थळावर गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत १८९ तक्रारी आल्या आहेत. यातील १०१ तक्रारींचा निपटारा करण्यात शासनाला यश मिळाले आहे. पुण्यातून संकेतस्थळावर या काळात १३ तक्रारी नोंदवण्यात आल्या. पुण्यातील सर्व तक्रारींचा निपटारा झाल्याची माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
शासनातर्फे २०११ मध्ये http://www.amchimulgi.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. या संकेतस्थळावर तसेच १८००२३३४४७५ या टोल फ्री क्रमांकावर गर्भलिंग निवडीविरोधात तक्रार नोंदवता येते. संकेतस्थळावर आतापर्यंत एकूण ६०१ तक्रारी नोंदवल्या गेल्या असून त्यातील ४७५ तक्रारींचा निपटारा झाला आहे. तर हेल्पलाइनद्वारे ५६३ तक्रारी नोंदवल्या गेल्या असून त्यातील ५३१ तक्रारींचा निपटारा झाला असल्याची आकडेवारी आरोग्य विभागातून मिळाली. तक्रारींच्या चौकशीअंती राज्यात ४८ सोनोग्राफी मशिन्सना टाळे ठोकण्यात आले आहे, तर ३३ प्रकरणांत खटले भरण्यात आले आहेत. संकेतस्थळावरील तक्रारींवरून भरण्यात आलेल्या खटल्यांमध्ये प्रामुख्याने जळगाव, अहमदनगर आणि बीडमध्ये भरलेल्या खटल्यांचा समावेश आहे.
विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ‘गर्भलिंग निवडीविरोधातील तक्रारीवर ७ दिवसांत चौकशी होणे अपेक्षित असते. प्रत्येक तक्रारीत ७ दिवसांत चौकशी पूर्ण होत नसली, तरी तक्रारींचा निपटारा लवकर केला जात आहे. संशयित सोनोग्राफी केंद्राविषयीची निनावी माहिती, सोनोग्राफी केंद्राच्या माहितीमधील त्रुटी या गोष्टी विचारात घेऊन स्टिंग ऑपरेशन्सही केली जात आहेत. हेल्पलाइनद्वारे आलेल्या १० तक्रारींवर स्टिंग ऑपरेशन्स करण्यात आली आहेत.’
पुण्यातील सर्व तक्रारींचा निपटारा झाला
पुण्यातून ‘आमची मुलगी’ संकेतस्थळावर आतापर्यंत २७ तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. यात पुणे महापालिकेअंतर्गत २ तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या, तर पिंपरी-चिंचवडमधून एकही तक्रार नोंदवली गेली नव्हती. या सर्व तक्रारींचा निपटारा झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.