पुणे : ‘पोलीस कर्तव्य मेळावाच्या माध्यमातून सहभागी संघातील पोलीस कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढणार आहे. त्याचा फायदा पोलीस दलास होणार आहे,’ असे मत राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनीचे संचालक दत्ता पडसलगीकर यांनी बुधवारी व्यक्त केले.
राज्य राखीव पोलीस दलाच्या आवारात २० व्या राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस कर्तव्य मेळाव्याचे उद्घाटन दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद, कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुहास वारके, विशेष पोलीस महानिरीक्षक डाॅ. राजेंद्र डहाळे, पिंपरी-चिंचवडचे सहपोलीस आयुक्त सुहास महानवर, विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर, लष्करी गुप्तचर यंत्रणेचे संचालक एम. रामकुमार, उपमहानिरीक्षक बसवराज तेली, अमोल गावकर, तेजस्वी सातपुते, पल्लवी बर्गे यावेळी उपस्थित होते.
पोलीस कर्तव्य मेळाव्यात सहभागी झालेल्या पाेलीस संघांना दत्ता पडसलगीकर यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ‘पोलीस कर्तव्य मेळाव्यात सहभागी झालेले संघ तपास कौशल्य सादर करतात. तपास शास्त्रीयदृष्ट्या कसा करावा, पुराव्याचे संकलन अशा बाबींचे प्रात्यक्षिक सादर केले जातात. पोलीस कर्तव्य मेळाव्यामुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे तपास कौशल्य वाढीस लागणार आहे. या मेळाव्यात सहभागी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांची चित्रफीत तयार करून ती राज्यातील विविध पोलीस घटकात प्रसारित करावी.’ सुनील रामानंद यांनी प्रास्ताविक केले. डाॅ. राजेंद्र डहाळे यांनी आभारप्रदर्शन केले.